सामूहिक कॉपीचं 'गुजरात मॉडेल'; 959 कॉपीबहाद्दरांनी लिहिली चुकीची उत्तरं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 12:59 PM2019-07-16T12:59:20+5:302019-07-16T13:00:13+5:30
बारावीच्या परीक्षेत जोरदार सामूहिक कॉपी
अहमदाबाद: गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सामूहिक कॉपी पकडली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या ९५९ विद्यार्थ्यांना पकडलं. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं कॉपीबहाद्दर पकडले गेले आहेत.
परीक्षेत कॉपी होऊ नये यासाठी गुजरातच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागानं अनेक पावलं उचलली होती. मात्र तरीही परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी झाली. आता सामूहिक कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल बोर्डाकडून राखून ठेवण्यात आले असून ज्या विषयाच्या पेपरला त्यांनी कॉपी केली, त्या विषयात त्यांना नापास करण्यात आलं आहे. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ९५९ विद्यार्थ्यांनी लिहिलेलं उत्तर अगदी सारखं होतं. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी लिहिलेलं उत्तर इतकं सारखं होतं की या सगळ्यांनी केलेली चूकदेखील सारखीच आहे. जुनागढ, गीर-सोमनाथ भागातील केंद्रावर सामूहिक कॉपीचे प्रकार घडले.
एका परीक्षा केंद्रावरील २०० विद्यार्थ्यांनी 'कुटुंबातील मुलीचं महत्त्व' या विषयावर सारखाच निबंध लिहिला. या २०० विद्यार्थ्यांच्या निबंधातील सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा अगदी शब्दनशब्द सारखाच आहे. याशिवाय अकाऊंट्स, इकॉनॉमिक्स, इंग्रजी साहित्य आणि स्टॅटिस्टिक्सच्या पेपरमध्येही कॉपी झाली आहे. यामुळे अमरापूर (गीर-सोमनाथ), विसानवेल (जुनागढ) आणि प्राची-पिपला (गीर-सोमनाथ) भागातील बारावीची परीक्षा केंद्रं रद्द करण्याच्या तयारीत आहे. परीक्षा सुधारणा समितीसमोर काही विद्यार्थ्यांनी कॉपीची माहिती दिली. परीक्षा केंद्रावंर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तरं वाचून दाखवली. त्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी पेपरवर उत्तरं उतरवून काढली.