गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार, आतापर्यंत 72 बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 06:03 AM2017-07-25T06:03:24+5:302017-07-25T12:28:37+5:30
देशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - देशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थान, आसम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळं पाच राज्यातील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्या पावसामुळं आलेल्या पुरानं आतापर्यंत 70 जणांचा बळी घेतला आहे. हवामान विभागाने या पाच राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच येणाऱ्या दोन दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर गुजरातमधील सौराष्ट्र , बनासकांठा आणि साबरकांठा तसंच दक्षिण गुजरातमधील वलसाडला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नदी, नाले व रस्ते पाण्याखाली गेल्याने गुजरातमधील रस्ते व रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने 900 जनावरांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर आणि हवाईदलाला पाचारण करण्यात आले आहे.
मोर्बी, राजकोट, सुरेंद्रनगर, बनासकांठा आणि अहमदाबाद जिल्हे पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी सरकारी इमारती व शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजप्रवाह ठप्प झाले आहेत. 19 राज्यमार्ग आणि 102 अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी नुकतीच सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पूरग्रस्त भागात अन्नाची पाकिटं व पाणी पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा कॉलेजस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत.