दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू; 50 जण रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 15:08 IST2022-07-26T15:07:02+5:302022-07-26T15:08:49+5:30
Gujarat Hooch Tragedy : पोलिसांनी याप्रकरणी 14 जणांना अटक केली आहे. बोटाद याठिकाणी ही भयंकर घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या लोकांना देशी दारू दिल्याचे सांगण्यात येत होते, मात्र, ही देशी दारू नसून केमिकल होते.

दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये विषारी दारूमुळे 28 जणांचा मृत्यू; 50 जण रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली - दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विषारी दारूमुळे तब्बल 28 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बोटाद जिल्ह्यमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये अहमदाबादमधील चार लोकांचा सामावेश आहे. तसेच विषारी दारूमुळे 50 पेक्षा जास्त लोकांची तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. यापैकी काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी 14 जणांना अटक केली आहे. बोटाद याठिकाणी ही भयंकर घटना घडली आहे. मृत्यू झालेल्या लोकांना देशी दारू दिल्याचे सांगण्यात येत होते, मात्र, ही देशी दारू नसून केमिकल होते. हे केमिकल एका कंपनीतून आणल्याची माहिती देखील आता मिळत आहे. देशी दारू म्हणून 40 रुपयांत हे केमिकल लोकांना देण्यात आलं. यामुळे अनेकांचा बळी गेला आहे.
Gujarat | Four people dead after drinking spurious liquor in Dhandhuka, six people have been shifted to Ahmedabad for further treatment: Dr Sanket, Medical Officer Dhandhuka pic.twitter.com/8I6wt2FNYI
— ANI (@ANI) July 25, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील लोकांना दारूच्या नावाखाली केमिकल देण्यात आलं. एफएसएल रिपोर्टमध्ये त्याचा खुलासा झाला आहे. तसेच लोकांनी जे दारू म्हणून प्यायलं त्यामध्ये 98 टक्क्यांहून अधिक मिथाइल होतं. आरोपींनी दारू नाही तर तिच्या नावाखाली केमिकलचं पाऊच तयार करून ते लोकांना विकलं आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ईमोस कंपनी ही मिथाइलच्या व्यवसायाशी संबंधित आहे.
ईमोस कंपनीचा गोडाऊन मॅनेजर जयेश उर्फ राजू यांचा यामध्ये हात आहे. जयेशने आपला नातेवाईक संजयला 60 हजार रुपयांत 200 लीटर मिथाइल विकलं होतं. यानंतर संजय, पिंटू आणि त्यांच्या साथीदारांनी यापासून दारू न बनवता थेट केमिकल पाऊच तयार केले आणि दारू म्हणून विकण्यास सुरुवात केली. हे प्यायल्यानंतर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.