न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 06:22 PM2024-10-22T18:22:13+5:302024-10-22T18:23:54+5:30
चक्क बनावट न्यायाधीश खोटे न्यायालय चालवून पैसे उकळत होता.
कधी बनावट आयपीएस अधिकारी तर कधी बनावट पोलीस... सोशल मीडियावर हास्यास्पद तितक्याच संतापजनक घटना व्हायरल होत असतात. गुजरातमधील अहमदाबाद येथून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली. इथे चक्क बनावट न्यायाधीश खोटे न्यायालय चालवून पैसे उकळत होता. विशेष बाब म्हणजे आरोपीने खोट्या खटल्यांमधून तब्बल १०० एकर सरकारी जमीन बळकावली. आरोपी खोटी कागदपत्रे तयार करत असे. त्याने स्वत:च कागदपत्रे तयार केली, न्यायालयासमोर ठेवली आणि सरकारी जमीन आपल्या नावे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. हा सर्व प्रकार समोर येताच एकच खळबळ माजली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
अहमदाबाद येथील या खोट्या न्यायाधीशाने वादग्रस्त जमिनीवर निर्णय देला. आरोपी वकील मॉरिस सॅमुअल ख्रिश्चियनने स्वत:ला न्यायाधीश घोषित करुन न्यायालयाचे कामकाज चालवले आणि सरकारी जमिनीवर खोटा आदेश जारी केला. मागील वर्षभरापासून गुजरातमधील अनेक खोटी प्रकरणे समोर येत आहेत. तक्रारदार हार्दिक देसाई यांनी खोट्या न्यायाधीशाचा पर्दाफाश करताना प्रशासनाच्या कारभावर प्रश्न उपस्थित केले. स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार दाखल करुन त्यांनी याविरोधात आवाज उठवला.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, आरोपी मॉरिसने २०१९ मध्ये वादग्रस्त जमिनीशी संबंधित प्रकरणावर मध्यस्थी करण्याचा आदेश दिला असल्याचे उघड झाले. याशिवाय आरोपी वासणा परिसरात एक खोटे न्यायालय चालवत होता, जिथे त्याने वकील, क्लर्क आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची भूमिका बजावली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १७०, ४१९, ४२०, ४६५, ४६७ आणि ४७१ नुसार गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाहीतर मणिनगर पोलीस स्थानकात यापूर्वी देखील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल आहे.