उमेदवार पतीला मतदारसंघात नो एंट्री, प्रतिस्पर्धी भाजपा उमेवाराविरोधात प्रचारात उतरल्या दोन पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 03:44 PM2024-04-16T15:44:19+5:302024-04-16T15:45:14+5:30
Gujarat Lok Sabha Election 2024: गुजरातमधील एका लोकसभा मतदारससंघामध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा मोर्चा त्याच्या चक्क दोन पत्नींनी सांभाळला आहे. या दोघीही मतदारसंघातील गावोगावी फिरून आपल्या पतीचा प्रचार करत आहेत.
एखाद्या नेत्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय उत्साहाने त्याच्या प्रचारात सहभागी होत असतात. काही नेत्यांच्या पत्नी त्यांच्यासाठी प्रचाराची धुरा सांभाळत असतात. मात्र गुजरातमधील एका लोकसभा मतदारससंघामध्ये आम आदमी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचा मोर्चा त्याच्या चक्क दोन पत्नींनी सांभाळला आहे. या दोघीही मतदारसंघातील गावोगावी फिरून आपल्या पतीचा प्रचार करत आहेत.
गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघात हे चित्र दिसत आहे. येथून आम आदमी पक्षाचे आमदार चैतर वसावा हे निवडणूक लढत आहेत. त्यांच्यासमोर भाजपाचे नेते मनसुख वसावा यांचे आव्हान आहे तसेच चैतर यांचे माजी सल्लागार छोटू वसावा यांचे पुत्र दिलीप वसावा हे भारतीय आदिवासी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.. मात्र कोर्टाच्या एका आदेशामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघातील काही भागात प्रचार करता येत नाही आहे. अशा परिस्थितीत चैतर वसावा यांच्या दोन्ही पत्नी प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेऊन मनसुख वसावा यांना आव्हान देत आहेत.
चैतर वसावा यांच्या एका पत्नीचं नाव शकुंतला आणि दुसरीचं नाव शकुंतला वसावा आहे. दोघीही एकत्रपणे पतीचा प्रचार करत आहेत. या दोघीही सरकारी कर्मचारी होत्या. मात्र २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राजीनामा देऊन पतीच्या प्रचारात सहभाग घेतला होता. गुजरातमधील बहुतांश आदिवासी समुदायांमध्ये बहुविवाहाची पद्धत आहे. तसेच अनुसूचित जमातींना हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींमधून सवलत देण्यात आली आहे. चैतर आणि शकुंतला यांचा विवाह १५ वर्षांपूर्वी झाला होता. तर त्यानंतर दोन वर्षांनी चैतर आणि वर्षा यांचा विवाह झाला होता.
हे तिघेही आपापल्या मुलांसह एकाच घरात राहतात. उल्लेखनीय बाब म्हणजे या तिघांमध्ये उत्तम समन्वय आहे. जानेवारी महिन्यात अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचे वरिष्ठ नेते गुजरातमध्ये आले होते तेव्हा चैतर यांच्यावतीने वर्षा तिथे उपस्थित होत्या. त्यावेळी चैतर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी शकुंतला ह्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात होत्या.
पुढच्या महिन्यात चैतर आणि शकुंतला ह्यांची सुटका झाली. मात्र चैतर यांच्या नर्मदा जिल्ह्यात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली. या जिल्ह्यातील काही भागाचा भरूच लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश आहे. त्यामुळे चैतर हे भरूचमधील इतर भागात प्रचार करत आहे. मात्र मनाई असलेल्या भागात त्यांना प्रचार करता येत नाही आहे. अशा भागात आता त्यांच्या दोन्ही पत्नी प्रचार करत आहेत.