अलर्ट! अनोळखी नंबरवरून मेसेज, पार्ट टाईम नोकरीची ऑफर अन् बँक खात्यातून गेले 6 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 12:18 PM2023-10-16T12:18:48+5:302023-10-16T12:19:37+5:30
एका व्यक्तीची 1-2 लाखांची नव्हे तर एकूण 6.12 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये त्या व्यक्तीला पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवण्यात आले.
सायबर फसवणुकीची रोज नवीन प्रकरणं समोर येत आहेत. गुजरातमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका व्यक्तीची 1-2 लाखांची नव्हे तर एकूण 6.12 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये त्या व्यक्तीला पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. या सायबर घोटाळ्याबद्दल जाणून घेऊया...
गुजरातमध्ये राहणारा दीपक सायबर फसवणुकीचा बळी ठरला आहे. या फसवणुकीत त्याच्या कष्टाचे 6.12 लाख रुपये गेले आहेत. दीपकने सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सएपवर मेसेज आला आणि मी जाळ्यात अडकलो असं म्हटलं आहे.
व्हॉट्सएपवरून एक मेसेज आला, ज्यामध्ये त्याला पार्ट टाईम नोकरीची ऑफर देण्यात आली होती. या पार्ट टाईम जॉबमध्ये युजर्सना सहज कमाई करण्याची संधी मिळत होती. नोकरीच्या वर्क प्रोफाईलमध्ये, युजर्सना हे अतिशय सोपं काम असल्याचं दाखवलं होतं. यामध्ये युजर्सना युट्युबचे व्हिडीओ लाईक करावे लागेल असं सांगितलं. प्रत्येक लाइकनंतर एक टास्क पूर्ण केलं जातं आणि प्रत्येक टास्कसाठी पैसे मिळायचे.
तीन आठवडे चाललेल्या या घोटाळ्यात या व्यक्तीने खात्यातून 6.12 लाख रुपये ट्रान्सफर केले. यानंतर टास्कमधून बोनस जिंकले आणि जेव्हा त्याच्या बँकेत ट्रान्सफर करण्यास सांगितले, तेव्हा तो तसे करू शकला नाही. यानंतर आपण सायबर फसवणुकीला बळी पडल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.