गुजरात नगरपालिका निवडणुकीत मुस्लीम मतदार भाजपकडे वळला, पक्षाचा विजय पक्का केला! आकडे बघून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 23:00 IST2025-02-25T22:58:44+5:302025-02-25T23:00:33+5:30
महत्वाचे म्हणजे, १८ फेब्रुवारीला जो निकाल आला, त्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आणि ती म्हणजे, आता गुजरातमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

गुजरात नगरपालिका निवडणुकीत मुस्लीम मतदार भाजपकडे वळला, पक्षाचा विजय पक्का केला! आकडे बघून थक्क व्हाल
गुजरातमध्ये नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) प्रचंड मोठा विजय मिळाला. महत्वाचे म्हणजे, १८ फेब्रुवारीला जो निकाल आला, त्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आणि ती म्हणजे, आता गुजरातमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. नगरपालिका, नगर परिषदा तसेच जिल्हा आणि तालुका पंचायतींच्या २,१७१ पैकी १,६०८ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
या निकालांतून एक महत्वाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे, ६६ नगरपालिकांमध्ये भाजपच्या तिकिटांवर मुस्लीम उमेदवारांच्या विजयात विक्रमी वाढ झाली आहे. याच बरोबर, ज्या जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायाचे मतदार मोठ्या प्रमाणावर आहे, तिथेही भाजपने आपले अस्तित्व निर्माण केले आहे.
2018 च्या तुलनेत 2025 मध्ये मुस्लीम उमेदवारांच्या विजयात वाढ -
या नगरपालिकांमध्ये २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटांवर ४६ मुस्लीम उमेदवार विजयी झाले होते. यावर्षी मात्र ही संख्या ७६ पर्यंत वाढली आहे. यांत ३३ महिलांचाही समावेश आहे. पक्षाने एकूण १०३ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. महत्वाचे म्हणजे, पाटण, खेडा, पंचमहल आणि जुनागढ जिल्ह्यातील नगरपालिकांमधूनही अनेक उमेदवार विजयी झाले आहेत, जेथे गेल्या निवडणुकीत भाजपचा एकही मुस्लिम उमेदवार विजयी जाला नव्हता.
२०१८ मध्ये, नगरपालिकांमध्ये २५२ मुस्लीम उमेदवार निवडून आले होते. ही संख्या आता २७५ पर्यंत वाढली आहे. यात काँग्रेसचा वाटा ३९ टक्के, भाजपचा २८ टक्के तर आम आदमी पक्षाचा (आप) वाटा ४.७ टक्के आहे. 'आप'चे १३ मुस्लीम उमेदवार विजयी झाले आहेत. यात जामनगरच्या सलाया नगरपालिकेचाही समावेश आहे, तेथे ११ उमेदवार विजयी झाले.