गुजरात मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीतून हार्दिक पटेल यांचे नाव गायब? जाणून घ्या, कोणत्या 25 चेहऱ्यांना मिळू शकते स्थान!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 05:39 PM2022-12-11T17:39:50+5:302022-12-11T17:40:43+5:30
bhupendra patel cabinet : आता गुजरातमध्ये सर्वाधिक चर्चेची बाब म्हणजे भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांना स्थान मिळणार आहे.
नवी दिल्ली : गुजरातमध्ये विक्रमी जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपने शनिवारी आपल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली आणि आता 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीची प्रतीक्षा आहे. गुजरातचे कार्यवाहक मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर भूपेंद्र पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन गुजरातमध्ये सरकार स्थापनेचा दावा केला. गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील हेही भूपेंद्र पटेल यांच्यासोबत राजभवनात गेले होते. विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर भूपेंद्र पटेल यांनी लगेचच राजभवन गाठले.
182 जागांच्या गुजरात विधानसभेत भाजपने 156 जागा जिंकल्या आहेत. बंपर विजयानंतर सरकार स्थापनेचा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे. आता गुजरातमध्ये सर्वाधिक चर्चेची बाब म्हणजे भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांना स्थान मिळणार आहे. दरम्यान, गुजरातच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे. या यादीत हर्ष संघवी, अल्पेश ठाकोर, जितू वाघानी, किरीट सिंह राणा आणि कनू देसाई यांच्यासह एकूण 25 नावांचा समावेश आहे. मात्र, या यादीत हार्दिक पटेल यांचे नाव नसल्याचे समजते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, चर्चेचा विषयही बनला आहे.
गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळात अनेक तरुण चेहऱ्यांचा समावेश करण्याची चर्चा आहे. संभाव्य मंत्रिमंडळ यादीनुसार किरीट सिंह राणा, कनू देसाई, हृषिकेश पटेल, कुंवरजी बावलिया, रमणलाल व्होरा, गणपत वसावा, नरेश पटेल, हर्ष सांघवी, बाळकृष्ण शुक्ला यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. याशिवाय, जयेश रादाडिया, शंभूप्रसाद टुंडिया, मौलू बेरा, अल्पेश ठाकोर, जितू वाघानी, मनीषा वकील आणि भानू बाबरिया यांच्या नावाचीही चर्चा झाली आहे. याचबरोबर, मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या नव्या मंत्रिमंडळात हीरा सोलंकी, दर्शना वाघेला, शंकर चौधरी, निकुल पटेल, पंकज देसाई, दर्शना देशमुख, पीसी बरंडा, जगदीश विश्वकर्मा आणि कौशिक वेकारिया हेही मंत्री होऊ शकतात.
18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार भूपेंद्र पटेल
भूपेंद्र पटेल 12 डिसेंबर रोजी 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. गांधीनगर येथील नवीन सचिवालयाजवळील हेलिपॅड मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या वर्षभर आधी भाजपेने भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री केले होते. त्यांनी विजय रुपानी यांची जागा घेतली होती.