रुपाणीनंतर कोण होणार मुख्यमंत्री? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं; मोदी-शहा काय करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 10:00 PM2021-09-11T22:00:39+5:302021-09-11T22:01:13+5:30
विजय रुपाणी यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; भाजपचं बैठकांचं सत्र सुरू
अहमदाबाद: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीआधीही भाजपनं मुख्यमंत्री बदलला होता. आताही भाजपनं निवडणुकीला काही महिने राहिले असताना भाकरी फिरवली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह २ मंत्र्यांची नावं आघाडीवर आहेत. मात्र आपण या शर्यतीत नसल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.
मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. मला ते पद नको, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. पाटील यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर केलं आहे. मात्र यामुळे मुख्यमंत्रिपदाची शर्यत आणखी चुरशीची होणार आहे. पाटील यांच्यासोबतच मनसुख मंडाविया आणि नितीन पटेल यांची नावं चर्चेत आहेत. मंडाविया आणि पटेल यांच्यासोबतच पुरुषोत्तम रुपाला आणि गोरधन जडाफिया यांच्या नावांचीदेखील चर्चा आहे. भाजपच्या आमदारांची बैठक उद्या होत आहे. याच बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल.
...म्हणून रुपाणींनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; मोदी-शहांच्या गुजरातमध्ये नेमकं चाललंय काय?
रुपाणी यांचा राजीनामा कशासाठी?
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा कशासाठी घेण्यात आला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र भाजपनं या निर्णयाची तयारी आधीपासूनच केल्याचं सांगितलं जात आहे. भाजप अशाप्रकारचे प्रयोग करत आला आहे, वेळोवेळी नेतृत्त्व बदल गरजेचा आहे, असं भाजप नेते पुरुषोत्तम रुपाला यांनी म्हटलं होतं. कोरोना परिस्थिती हाताळण्यात आलेलं अपयश, पाटीदारांची नाराजी, बेरोजगारी यामुळे रुपाणी यांना राजीनामा द्यावा लागल्याचं बोललं जात आहे.