बापरे! पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेला आलं २० लाखांचं वीज बिल, कुटुंबाला मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 04:13 PM2024-08-11T16:13:27+5:302024-08-11T16:20:39+5:30
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेच्या घरामध्ये फक्त पंखा, टीव्ही आणि फ्रीज सुरू असतानाही तब्बल २० लाख रुपयांचं वीज बिल आलं आहे.
गुजरातमधील नवसारी येथे वीज विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेच्या घरामध्ये फक्त पंखा, टीव्ही आणि फ्रीज सुरू असतानाही तब्बल २० लाख रुपयांचं वीज बिल आलं आहे. एवढेच नाही तर घरातील चारपैकी तीन सदस्य कामावर असतात. असं असतानाही प्रचंड बिल आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
नवसारीतील बिलीमोरा शहरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेला २० लाख रुपये वीज बिल आलं, जे साधारणपणे नेहमी २ हजार रुपये येतं. एवढे बिल पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. दक्षिण गुजरात वीज कंपनीच्या मीटर रीडरने त्यांना जून-जुलै महिन्याचे विजेचे बिल दिले, त्यात २० लाख १ हजार ९०२ रुपये एवढी रक्कम लिहिली होती.
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या पंक्तिबेन पटेल यांनी सांगितलं की, आमचं चार जणांचं कुटुंब असून मी पेट्रोल पंपावर काम करते. आमच्या घरात बल्ब, पंखे, फ्रीज आणि एक टीव्ही आहे. चार सदस्यांपैकी तीन सदस्य दिवसभर कामावर जातात. साधारणपणे, आमचं वीज बिल दर दोन महिन्यांनी २००० रुपये येते, जे आम्ही वेळेवर भरतो. आमची कोणतीही थकबाकी नाही, पण हे बिल चिंता वाढवणारं आहे.
आम्ही गुजरात वीज मंडळाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली असता, त्यांनी आम्हाला ५० रुपये भरून अर्ज करण्यास सांगितलं. आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, आम्हाला आमचं काम सोडून वीज मंडळ कार्यालयाला फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र, ही बाब जीईबीच्या अधिकाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने मीटर रीडरची चूक सुधारून तासाभरात नवीन बिल दिल्याने कुटुंबीयांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.