LIVE - गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपले, 176 आमदारांनी केले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 08:48 AM2017-08-08T08:48:00+5:302017-08-08T15:24:27+5:30
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झालेले मतदान संपले आहे.
गांधीनगर, दि. 8 - गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी सकाळी 9 वाजल्यापासून सुरु झालेले मतदान संपले आहे. सर्व 176 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती राज्य निवडणूक अधिका-यांनी दिली. दुपारी चार वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. संध्याकाळी पाचवाजता मतमोजणी सुरु होईल. संध्याकाळी सहावाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व नेते अहमद पटेल यांच्यासहीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व बलवंत सिंह राजपूत यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. काहीही झाले तरी अहमद पटेल यांचा विजय होऊ द्यायचा नाही, असा निश्चय केलेल्या भाजपाने त्यांच्याविरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. अहमद पटेल यांचा राज्यभेत जाण्याचा मार्ग रोखून वर्षअखेरीस होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करण्याची भाजपाची रणनीती आहे.
केंद्रातील सत्ताधारी भाजपाने येथे राज्यसभेच्या तीन जागांसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीयमंत्री स्मृती इराणी व बलंवत सिंह राजपूत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. बलवंत सिंह राजपूत यांनी अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. शाह व इराणी यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे. मात्र राजपूत यांना जिंकवण्यासाठी व पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजपाला अतिरिक्त मतं मिळवणे गरजेचं आहे.
दरम्यान, पटेल यांनी बंगळुरुहून परतलेल्या आमदारांची भेट घेतली व यानंतर स्वतःच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना पटेल म्हणालेत की, ''मला माझ्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. काँग्रेसच्या 44 आमदारांव्यतिरिक्त जदयूचा एक व राकांपाचे दोन आमदार माझ्यासाठी मतदान करतील.'' अहमद पटेल यांना विजयासाठी 45 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 57 वरुन 51 वर आले आहे.
दरम्यान, बंळगुरूहून परतल्यानंतर या आमदारांना आनंद जिल्ह्यातील नीजानंद रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. आता हे सर्व आमदार गांधीनगरकडे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले आहेत.
#WATCH: #Gujarat Congress MLAs leave Neejanand Resort in Anand showing victory sign, ahead of Rajya Sabha election voting. pic.twitter.com/Q0l86nyEJC
— ANI (@ANI_news) August 8, 2017
#Gujarat Congress MLAs leave from Neejanand Resort in Anand, ahead of Rajya Sabha election voting. pic.twitter.com/rpZvNnKjw7
— ANI (@ANI_news) August 8, 2017