चिंता वाढली! गुजरातमध्ये नवीन व्हायरसची एन्ट्री; २ दिवसांत ४ मुलांचा मृत्यूने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 12:15 PM2024-07-14T12:15:58+5:302024-07-14T12:17:19+5:30
कोरोना व्हायरसनंतर आता गुजरातमध्ये 'चांदीपुरा' नावाचा व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे दोन दिवसांत चार मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.
कोरोना व्हायरसनंतर आता गुजरातमध्ये 'चांदीपुरा' नावाचा व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे दोन दिवसांत चार मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. साबरकांठा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या मुलांचा मृत्यू झाला. सध्या मुलांचे सँपल पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचबरोबर या व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्हायरसची लागण झालेल्या आणखी दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभागही सक्रिय झाला असून साबरकांठा आणि अरावली जिल्ह्यात नवीन व्हायरसबाबत सर्वेक्षण सुरू केलं आहे.
'चांदीपुरा' व्हायरसची लागण झालेल्या मुलांमध्ये मेंदूला सूज येणं आणि इतर अनेक लक्षणं दिसू लागतात. व्हायरसची लागण झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांचे सँपलही आरोग्य विभागाकडून घेण्यात येत आहेत.
हिंमतनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण सहा रुग्ण दाखल होते. साबरकांठा येथील खेडब्रह्मा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर अरावली जिल्ह्यातील भिलोरा येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पाच जणांचे सँपल पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अजून एक सँपल पाठवायचं आहे.
सँपलचा रिपोर्ट सोमवारी येईल. व्हायरसबाबत आरोग्य विभाग सक्रिय झाला आहे. हा व्हायरस रोखण्यासाठी रविवारी आरोग्य विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक होऊ शकते, असा दावा केला जात आहे. या बैठकीत चाचणीसह इतर योजनांबाबत निर्णय घेतला जाईल.