CAA: मोदींना अभिनंदनपर पत्र लिहा, अन्यथा इंटर्नलचे गुण विसरा; गुजरातमधील शाळा वादात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 09:00 AM2020-01-10T09:00:17+5:302020-01-10T09:09:18+5:30
पालकांनी तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर शाळा प्रशासनाकडून माफी
अहमदाबाद: सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणारं पत्र लिहिण्याची सूचना केल्यानं गुजरातमधील शाळा वादात सापडली आहे. याबद्दल पालकांनी जोरदार आक्षेप नोंदवल्यानं शाळेनं माफी मागितली. अहमदाबादमधील लिटिल स्टार शाळेनं पाचवी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोदींना पत्र लिहिण्यास सांगितलं होतं. या पत्रातला मायनादेखील शाळेतील शिक्षकांनी वर्गांमधल्या फळ्यावर लिहून दिला होता. हाच मजकूर पत्रात लिहिण्याची सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली होती. 'इंडियन एक्स्प्रेस'नं हे वृत्त दिलं आहे.
'अभिनंदन. मी भारताचा नागरिक म्हणून सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल (सीएए) पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींचं अभिनंदन करतो. माझा आणि माझ्या कुटुंबाचा या कायद्याला पाठिंबा आहे,' असा मायना शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पत्रात लिहिण्यासाठी देण्यात आला होता. ही पत्रं 'पंतप्रधान कार्यालय, साऊथ ब्लॉक, सचिवालय इमारत, रायसिना हिल्स, नवी दिल्ली' या पत्त्यावर पाठवण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या.
पंतप्रधान मोदींना अभिनंदनपर पत्र न पाठवल्यास इंटर्नलचे गुण मिळणार नाहीत, असंदेखील विद्यार्थ्यांना शाळेकडून सांगण्यात आल्याचा दावा पालकांनी केला. 'सर्व विद्यार्थ्यांना पत्र लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या. काहींनी यास नकार दिल्यावर इंटर्नलचे गुण दिले जाणार नाहीत, अशी धमकीच त्यांना देण्यात आली. या पत्रावर विद्यार्थ्यांना त्यांचा स्वत:चा पत्तादेखील लिहिण्यास सांगण्यात आलं. यामागचं नेमकं कारण काय? पालकांच्या परवानगीशिवाय शाळा मुलांना पत्र लिहिण्यास कसं काय सांगू शकते?', असे प्रश्न एका पालकानं उपस्थित केले.
या प्रकरणी मोठा वाद निर्माण झाल्यानंतर शाळा प्रशासनानं माफी मागितली. गैरसमजातून हा प्रकार घडल्याची सारसासारव शाळा प्रशासनाकडून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांकडून लिहून घेण्यात आलेली पत्रं त्यांना परत करण्यात आली. 'काही शिक्षकांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. मला या पत्रांची कोणतीही कल्पना नव्हती. आम्ही पालकांना पत्रं परत केली आहेत. काही पालकांनी ती पत्रं फाडूनदेखील टाकली,' असं स्पष्टीकरण शाळेचे मालक आणि विश्वस्त जिनेश परास्रम यांनी दिलं.