गुजरात मॉडेल? दहावीच्या परीक्षेत 63 शाळांमधील 100% विद्यार्थी नापास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 05:58 PM2019-05-22T17:58:58+5:302019-05-22T17:59:58+5:30
यंदा गुजरात बोर्डाचा निकाल 66.97 टक्के
गांधीनगर: गुजरातशिक्षण विभागाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाबद्दलची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील 63 शाळांमधील एकाही विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होता आलेलं नाही. यंदा राज्याचा दहावीचा निकाल 66.97 टक्के इतका लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात किंचित घसरण झाली. गेल्या वर्षी गुजरात बोर्डाचा निकाल 67.5 टक्के लागला होता.
गुजरातच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष ए. जे. शहा यांनी निकालाबद्दल अधिक माहिती दिली. यंदा राज्यातील 8,22,823 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यातील 5,51,023 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अशी आकडेवारी त्यांनी दिली. ज्या शाळांमधील एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकला नाही, अशा शाळांची संख्या 63 इतकी असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. आधी अपयशी ठरल्यानं पुन्हा परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची कामगिरीदेखील यंदा फारशी चांगली झाली नाही. पुन्हा परीक्षेला बसलेले केवळ 17.23 टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले.
यंदाही उत्तीर्ण मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त आहे. परीक्षा दिलेल्या एकूण मुलींपैकी 72.64 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 62.83 इतकी आहे. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांनी यंदा बाजी मारली. इंग्रजी माध्यमात शिकणारे 88.11 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर हिंदी माध्यमाचे 72.66 टक्के, गुजराती माध्यमाचे 64.58 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले.