Gujarat Truck Accident: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले, १४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 02:13 AM2021-01-20T02:13:30+5:302021-01-20T02:20:24+5:30
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी १२ लोकांचा मृत्यू झाला, तर तीन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतात मध्यप्रदेशातील एका १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे.
सूरत : रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या स्थलांतरीत मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याची दुर्घटना गुजरातच्या सुरतमध्ये मंगळवारी घडली. मृतात एका मुलीचा, तर ८ महिलांचा समावेश आहे. यातील एक कामगार मध्यप्रदेशचा आहे.
पोलिसांनी सांगितले की, घटनास्थळी १२ लोकांचा मृत्यू झाला, तर तीन जणांचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृतात मध्यप्रदेशातील एका १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे. हे सर्व मजूर राजस्थानातील बांसवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. हा अपघात सुरतपासून जवळपास ६० किमी अंतरावर कोसांबा गावाजवळ झाला.
भरधाव ट्रक अगोदर एका उसाच्या ट्रॅक्टरला धडकला. त्यानंतर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. हे लोक किम - मांडवी रोडच्या बाजुला झोपले होते. भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. ट्रॅक्टरला धडकल्यानंतर ट्रकची पुढील काच फुटली. त्यामुळे चालकाला समोरचे काही दिसले नाही. धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. याच ठिकाणी झोपलेल्या लोकांना ट्रकने चिरडले. जखमी तीन लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मृतांच्या कुटुंबियांना केंद्र, राज्याकडून मदत -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत जाहीर केली आहे.