5 जिंकले…, एकानं सोडली केजरीवालांची साथ; गुजरातमधील आपचा आमदार भाजपत सामील होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 03:39 PM2022-12-11T15:39:27+5:302022-12-11T15:41:07+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. ते तब्बल दोन महिने गुजरातमध्ये तळ ठोकून होते.
भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाची धूळधाण उडवल्यानंतर, आता पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुजरातमध्ये सरकार स्थापन होण्यापूर्वीच आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने अरविंद केजरीवाल यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये 'आप'ला एकूण पाच जागा मिळाल्या आहेत. मात्र आता, एका आमदाराने साथ सोडल्यानंतर, राज्यात आम आदमी पक्षाकडे केवळ चारच आमदार उरले आहेत. सोमवारी गुजरातमधील विसाबदार मतदारसंघातील आपचे आमदार गांधीनगरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. ते तब्बल दोन महिने गुजरातमध्ये तळ ठोकून होते. एवढेच नाही, तर निवडणुकीच्या एक दिवस आधीपर्यंत, ते आप गुजरातमध्ये संपूर्ण बहुमतात येत असल्याचा दावा करत होते. जेव्हा प्रत्यक्षात निकाल आले, तेव्हा त्यात त्यांना केवळ पाचच जागा मिळाल्याचे दिसून आले. या धक्क्यातून आम आदमी पक्ष अद्याप बाहेर पडू शकलेला नाही. तोच आता, या पाचपैकी एका आमदाराने पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर ते भाजप जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आम आदमी पक्ष सोडून भाजपत सामील होत असल्याची घोषणा करणाऱ्या आमदाराचे नाव आहे भूपत भाई भयाणी. ते जुनागड जिल्ह्यातील विसावदर जागेवर निवडून आले आहेत. ते या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच भाजप सोडून AAP मध्ये सामील झाले होते.
या जागेवर भाजपने काँग्रेस सोडून आलेल्या हर्षद रिबाडिया यांना तिकीट दिले होते. तर काँग्रेसने या जागेसाठी करशन वडोदरिया यांना तिकीट दिले होते. यामुळे भूपत भाई यांचा सामना थेट हर्षद रिबाडिया यांच्यासोबत होता. ही निवडणूक भूपत भाई यांनी 6904 मतांनी जिंकली. या निवडणुकीत भूपत भाई यांना 65675 तर हर्षद यांना 58771 मते मिळाली होती.