Khambhat Violence : खरगोननंतर गुजरातच्या खंभातमध्येही चालला बुलडोझर, अनेक दुकानं जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 04:57 PM2022-04-15T16:57:26+5:302022-04-15T17:00:17+5:30
रामनवमीला काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही समाज कंटकांनी हल्ला केला होता. यानंतर आता, त्या भागात बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यात, अनेक बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली दुकाने आणि अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत.
गुजरातमधील (Gujrat) खंभात येथे रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी (Ram Navami Violence) सरकारने मोठी कारवाई केली आहे. रामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही समाज कंटकांनी हल्ला केला होता. यानंतर आता, त्या भागात बुलडोझर फिरवण्यात आला आहे. यात, अनेक बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली दुकाने आणि अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत.
बेकायदा मालमत्तांवर चालला बुलडोझर -
मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारातील आरोपींची मालमत्ताही बेकायदेशीर असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. ही मालमत्ता खरोखरच बेकायदेशीर असल्याचे आढळून आल्यास, त्यांवरही बुलडोझर चालविला जाणार आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील खरगोनमध्येही हिंसाचार आणि दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर प्रशासनाने बुलडोझर चालवून त्या जमीनदोस्त केल्या आहेत.
रामनवमीच्या दिवशी झाला होता हिंसाचार -
गुजरात मधील आनंद जिल्ह्यात रामनवमीच्या दिवशी हिंसाचार झाला होता. खंभात भागात झालेल्या हिंसाचारासंदर्भात एका पाठोपाठ एक खुलासेही होत आहेत. एवढेच नाही तर, रामनवमीच्या शोभा यात्रेवर हल्ल्याचा सुनियोजित कट रचण्यात आला होता, अशी माहितीही पोलीस तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी केला मोठा खुलासा -
खंभात येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यासाठी मुलांना बाहेरून बोलावण्यात आले होती. एवढेच नाही, तर पकडले गेल्यास त्यांना सर्व प्रकराचे कायदेशीर आणि आर्थिक सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे, हा कट रचणाऱ्यांनी कब्रस्तान जवळ उभे राहून मिरवणुकीवर दगडफेक करायचे आधीच ठरवले होते. कारण कब्रस्तानात दगड सहजपणे सापडतात, असे पोलिसांनी म्हटले आहे.
खरगोनमध्येही चाललागेला बुलडोझर -
रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर, खंभातशिवाय मध्यप्रदेशातील खरगोनमध्येही सरकारने हिंसाचाराच्या आरोपींविरोधात जबरदस्त कारवाई केली आहे. खरगोनचे डीआयजी तिलक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकारात 84 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय, आरोपींच्या घरांवर आणि दुकानांवरही कारवाई करण्यात आली आहे. यात 16 घरे आणि 29 दुकानांवर बुलडोझर चालविण्यात आला आहे.