दारूबंदी असलेल्या गुजरातमध्ये चार वर्षांत मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 02:35 AM2021-01-12T02:35:06+5:302021-01-12T02:35:43+5:30
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्व्हेत (२०१९-२०) गुजरातमधील ३३ हजार ३४३ महिला आणि ५,३५१ पुरुष सहभागी होते. यापैकी दोनशे महिलांनी (०.६ टक्के) मद्यपान करीत असल्याचा दावा केला.
अहमदाबाद : गुजरातमध्ये १९६० मध्ये दारूबंदी लागू करण्यात आल्यापासून गेल्या चार वर्षांत या राज्यात मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या दुप्पट झाली आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातून (एनएफएचएस) हे वास्तव समोर आले आहे.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्व्हेत (२०१९-२०) गुजरातमधील ३३ हजार ३४३ महिला आणि ५,३५१ पुरुष सहभागी होते. यापैकी दोनशे महिलांनी (०.६ टक्के) मद्यपान करीत असल्याचा दावा केला. २०१५-१६च्या सर्व्हेनुसार ६८ महिलांनी मद्यपान करीत असल्याचे म्हटले होते. या चौथ्या सर्व्हेत २२,९३२ महिला आणि ५,५७४ पुरुषांना सहभागी करण्यात आले होते. या दोन्ही सर्व्हेची तुलना केली असता पुरुषांच्या मद्यपानाचा दर निम्म्यावर आला आहे.
२०१५-१६ च्या सर्व्हेत सहभागी झालेल्या ५,५७४ पैकी ६१८ पुरुषांनी मद्यपान करीत असल्याचे सांगितले होते. तथापि, अलीकडच्या सर्व्हेत ३१० पुरुषांनी मद्यपान करीत असल्याचे सांगितले.