'मी तिची आई असल्याचं तिला सांगू नका...', पोटच्या मुलीची कस्टडी देताना आईची कोर्टाकडे अजब मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 03:48 PM2022-05-06T15:48:54+5:302022-05-06T15:49:23+5:30
गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील न्यायालयानं सात वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे दिला.
मेहसाणा-
गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील न्यायालयानं सात वर्षांच्या मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे दिला. ती अवघ्या दोन दिवसांची असताना तिच्या पालकांनी तिला सोडून दिलं होतं. मुलीनं सात वर्षे अनाथाश्रमात घालवली आणि सात वर्षानंतर आता कोर्टानं तिचा ताबा वडिलांकडे दिला आहे. आईनं मुलीला वडिलांकडे सोपवण्यापूर्वी एक अट घातली की तिच्या मुलीला तिच्या आईची ओळख कधीच सांगितली जाऊ नये. तसंच तिला कधीच आपल्याकडे आणूही नये.
हे प्रकरण मेहसाणातील रणसन गाव येथील आहे. मुलीचे जैविक पालक हे चुलत भाऊ-बहिण आहेत. दोघांमध्ये शारीरिक संबंध झाल्यानंतर एका मुलीचा जन्म झाला. त्यांचं लग्न झालं नव्हतं आणि नात्यानं भावंड असल्यानं त्यांना समाजात अपमानाची भीती होती. त्यांना गर्भपातही करता आला नाही. दोघांनीही खूप गुप्तता बाळगली आणि मुलीला जन्म दिला.
जन्माच्या दुसऱ्याच दिवशी मुलीला सोडलं
बाळाच्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ ऑक्टोबर २०१५ रोजी दोघं अर्जुनपुरा गावातील बसस्थानकाजवळ पोहोचले. येथे त्यांनी गुपचूप मुलीला सोडलं आणि तेव्हाच काही लोकांनी त्यांना पाहिलं. स्थानिक लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. लहान बाळाला असं बेवारस सोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि मुलीला गांधीनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
बाळाच्या वडिलांनी मागितली कस्टडी
आईला आपल्या बाळाबद्दल अजिबात प्रेम नाही, तर वडिलांनी तिला अनाथ म्हणून वाढवायचं नसल्यामुळे तिचा ताबा देण्याची मागणीचा आग्रह धरला, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. आपल्या आदेशात आईचं म्हणणं देखील कोर्टानं तपशीलवार नोंदवलं आहे. 'मुलाला कोणाकडेही दिलं तरी माझी काही हरकत नाही. परंतु बाळाचा माझ्याशी कोणताही संबंध असू नये', असं आईनं म्हटलं आहे.
मुलीमुळे समाज कलंकित ठरवेल
मुलीमुळे आपलं भविष्य धोक्यात येऊ शकतं आणि सामाजिक कलंक आपल्यावर लावला जाऊ शकतो, असं मत जेव्हा मुलीच्या आईनं व्यक्त केलं त्यावर कोर्टानं नाराजी व्यक्त केली. 'मला समाजाची भीती वाटते म्हणून मुलीला माझ्याजवळ मला ठेवायचं नाही. जर कोणी मला विचारलं की ते कोणाचं मूल आहे, तर मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला लाज आणि संकोच वाटेल', असं तिनं कोर्टाला सांगितलं.
या महिलेनं पुढे सांगितलं की, 'मुलीचा ताबा तिच्या वडिलांकडे दिल्यास मला कोणतीही अडचण नाही, परंतु तिला कधीही माझ्याकडे ते आणणार नाहीत आणि मी तिची आई आहे हे तिला कधीही सांगणार नाहीत ही माझी अट आहे'