बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 03:27 PM2024-05-17T15:27:08+5:302024-05-17T15:27:54+5:30
बोर्ड परीक्षेत अव्वल आलेल्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला.
Class 10 topper dies : गुजरातमधील मोरबी येथील बोर्ड परीक्षेत अव्वल आलेल्या तरूणीचा मृत्यू झाला. १६ वर्षीय मुलीचा बुधवारी ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (GSRB) निकाल ११ मे रोजी जाहीर झाला. मृत हीर घेटिया या मुलीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९९.७० टक्के गुण मिळवले होते. पण तिला ब्रेन हॅमरेज झाला होता आणि महिनाभरापूर्वी तिच्यावर राजकोटमधील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
ऑपरेशननंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आणि ती घरी परतली. परंतु सुमारे एक आठवड्यापूर्वी तिला पुन्हा श्वास आणि हृदयाचा त्रास होऊ लागला. मग पुन्हा रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि एमआरआय अहवालात तिच्या मेंदूचे जवळपास ८० ते ९० टक्के काम थांबल्याचे समोर आले.
कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
अखेर बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने हीरचा मृत्यू झाला, त्यानंतर तिच्या पालकांनी आपल्या लेकीचे डोळे आणि शरीर दान करण्याचा निर्णय घेतला. हीरच्या वडिलांनी सांगितले की, माझ्या मुलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. म्हणूनच तिचे अवयव दान केले जेणेकरून ती डॉक्टर होऊ शकली नसली तरी ती इतरांचे प्राण वाचवू शकेल.
हीरच्या कुटुंबीयांनी सांगितले की, हीरने दहावीच्या बोर्ड परीक्षेत ९९.७०% गुण मिळवले होते. टॉपर्सच्या यादीत तिचा समावेश झाला. हीरला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले होते. तिला भविष्यात डॉक्टर व्हायचे होते. पण तिने लहान वयातच या जगाचा निरोप घेतला. हीर पहिल्यापासून अभ्यासात खूप हुशार होती. पण, आमची मुलगी आम्हाला अशी सोडून जाईल, याची आम्हाला कल्पना देखील नव्हती.