गुजरातमध्ये दारुबंदी पण उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा "फुल टाईट"
By admin | Published: May 9, 2017 02:07 PM2017-05-09T14:07:39+5:302017-05-09T14:26:48+5:30
उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मुलाने मद्यपान करुन अहमदाबाद विमानतळावर गोंधळ घातल्याचे प्रकरण समोर आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 9 - दारुबंदी असलेल्या गुजरातमध्ये उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या मुलाने मद्यपान करुन अहमदाबाद विमानतळावर गोंधळ घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. नितीन पटेल यांचा मुलगा जयमान त्याच्या कुटुंबासह सुट्टीसाठी ग्रीसला निघाला होता. सोमवारी पहाटे जयमान पत्नी आणि मुलीसह अहमदाबाद विमानतळावर आला त्यावेळी तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता.
त्याला धड उभेही राहता येत नव्हते. त्याने व्हीलचेअरवर बसून इमिग्रेशन आणि अन्य तपासण्या पूर्ण केल्या. जयमानने अतिमद्यपान केले असल्याने त्याला कतार एअरवेजच्या कर्मचा-यांनी विमानात चढण्यापासून रोखले. त्यामुळे संतापलेल्या जयमालने एअरवेजच्या कर्मचा-यांबरोबर वाद घातला. दरम्यान नितीन पटेल यांनी गांधीनगरमध्ये बोलताना मुलाने मद्यपान केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
हा मला बदनाम करण्याचा कट आहे. माझा मुलगा, सून आणि मुलगी सुट्टीसाठी ग्रीसला चालले होते. मुलाची तब्येत बरी नव्हती अशी सारवासारव त्यांनी केली. सूनेने फोन करुन माहिती दिल्यानंतर त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला असे नितीन पटेल म्हणाले. विरोधक खोटी माहिती पसरवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत असे नितीन पटेल म्हणाले.
नितीन पटेल हे गुजरातमधील भाजपाचे मोठे नेते आहेत. आनंदीबेन पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतर नितीन पटेल यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. तेच मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित असताना विजय रुपानी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली.