गुजरातच्या 'नीच' राजकारणात भाजपाला पडला निवडणूक जाहीरनाम्याचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 11:44 AM2017-12-08T11:44:18+5:302017-12-08T11:52:18+5:30
भाजपाकडून व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यात येईल असे बोलले जात होते. पण अद्यापपर्यंत तरी भाजपाने जाहीरनाम्यातून मतदारांना कुठलेही वचन दिलेले नाही.
अहमदाबाद - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वापरलेल्या नीच शब्दावरुन गुजरातमध्ये सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. या नीच शब्दाच्या राजकारणात गुजरात भाजपाला निवडणूक जाहीरनाम्याचा विसर पडला आहे. गुजरातमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाला 24 तासांपेक्षा कमी वेळा राहिलाय पण भाजपाने अजूनही निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. त्यावरुन विरोधकांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. काल दुपारी पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या.
भाजपाकडून व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यात येईल असे बोलले जात होते. पण अद्यापपर्यंत तरी भाजपाने जाहीरनाम्यातून मतदारांना कुठलेही वचन दिलेले नाही. भाजपाचा कट्टर विरोधक हार्दिक पेटलनेही टि्वट करुन निशाणा साधला आहे. भाजपा सेक्स सीडी बनवण्यामध्ये भरपूर व्यस्त आहे. त्यामुळे ते निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करायला विसरले असे टि्वट हार्दिक पटेलने केले.
CD बनाने के चक्कर में भाजपा घोषणा पत्र बनाना भूल गई,कल वोटिंग हैं।😂😂😂😂
— Hardik Patel (@HardikPatel_) December 8, 2017
भाजपाची खिल्ली उडवताना त्याने हसणारे चार इमोजीही टि्वट केले आहेत. याच मुद्यावरुन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही भाजपावर टीका केली. भाजपा जाहीरनामा टाळत आहे त्यावरुन ते गुजरातच्या जनतेचा किती अनादर करतात ते दिसते असे राहुल गांधी म्हणाले. गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे.
कोंग्रेस पार्टी के नेता ने ग़लत शब्द का इस्तेमाल किया और कोंग्रेस पार्टी ने उसको ससपेंड कर दिया,लेकिन अभी के प्रधानमंत्री जब CM थे तब चुनाव प्रचार में हिंदुस्तान की बहु को बार गर्ल कहते थे क्या वो ठीक था !!!
— Hardik Patel (@HardikPatel_) December 8, 2017
'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत'
'भलेही नीच जातीचा असलो, तरी कामं मोठी केली आहेत', असं सांगत नरेंद्र मोदींनी मणिशंकर अय्यर यांना सुनावलं आहे. सूरतमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं. ते बोलले की, 'उच्च आणि नीच या गोष्टी त्यांच्या संस्कारातच नाहीत. या सर्व गोष्टी त्यांनाच लख लाभो'. याआधी मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका केली होती.
मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन नाही
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी वापरलेल्या भाषेचं समर्थन करु शकत नसल्याचं म्हणत त्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींनी आपलं मत व्यक्त केलं. ते बोललेत की, 'भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस पक्षावर टीका करताना नेहमीच असभ्य भाषेचा वापर केला आहे. काँग्रेसची संस्कृती आणि वारसा वेगळा आहे. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधानांवर टीका करताना वापरलेल्या भाषेचं समर्थन होऊ शकत नाही. मी आणि काँग्रेस पक्ष त्यांनी माफी मागावी अशी अपेक्षा करतो'.