गुज्जरांच्या आंदोलनाने रस्ते, रेल्वे बंद; जमावबंदी लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 06:03 AM2019-02-12T06:03:15+5:302019-02-12T06:03:47+5:30
लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच राजस्थानातील गुज्जर समाजाने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात पाच टक्के राखीव जागांच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन पेटले आहे.
जयपूर : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच राजस्थानातील गुज्जर समाजाने सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात पाच टक्के राखीव जागांच्या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन पेटले आहे. सोमवारी सलग चौथ्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग अडवून ठेवला. हा महामार्ग जयपूरला आग्य्राशी आणि राजस्थानच्या दौसा जिल्ह्याशी जोडणारा आहे. आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू केली आहे.
दौसात सिकंदरा येथे राष्ट्रीय महामार्ग ११ आंदोलकांनी बंद पाडला. बुंदी जिल्ह्यात नैनवा येथे रविवारी राज्य महामार्ग अडवून ठेवण्यात आला, तसेच सवाई माधोपूरमधील मलारना रस्ता आणि करौलीतील बुदला खेड्यात करौली-हिंदौन रस्ताही अडवून ठेवण्यात आला असल्याचे पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) एम. एल. माथूर यांनी सांगितले.
दौसाचे पोलीस अधीक्षक प्रल्हाद सिंह म्हणाले की, अडवून ठेवण्यात आलेल्या रस्त्याकडे जाणारी वाहने पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली. वाहतूक वळविण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. रस्ता अडवून ठेवण्याचे हे आंदोलन शांततेत आहे, असे सिंह म्हणाले. रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षणी राजस्थानात एक राष्ट्रीय महामार्ग, एक राज्य महामार्ग, दोन प्रमुख रस्ते आणि दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग आंदोलकांनी बंद पाडले आहेत. त्यामुळे अनेक रेल्वे रद्द कराव्या लागल्या किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले. (वृत्तसंस्था)
२५0 गाड्यांवर परिणाम
या आंदोलनाला ढोलपूर जिल्ह्यात रविवारी गोळीबार होऊन पोलिसांची वाहने पेटविली गेल्यावर हिंसक वळण लागले. त्यानंतर, अधिकाºयांनी ढोलपूर आणि करौली जिल्ह्यांत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४४वे कलम (जमावबंदी) लागू केले. ते सध्याही लागू आहे. शुक्रवारी आंदोलन सुरू झाल्यापासून २५०पेक्षा जास्त रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.