गुजराल यांची चौकशी
By admin | Published: May 1, 2016 01:48 AM2016-05-01T01:48:32+5:302016-05-01T01:48:32+5:30
अगुस्ता वेस्टलँडसोबत ३६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यातील कथित गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) शनिवारी भारतीय वायुसेनेचे माजी उपप्रमुख
नवी दिल्ली: अगुस्ता वेस्टलँडसोबत ३६०० कोटी रुपयांच्या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यातील कथित गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) शनिवारी भारतीय वायुसेनेचे माजी उपप्रमुख जे.एस. गुजराल यांची चौकशी केली.
माजी हवाईदल प्रमुख एस.पी. त्यागी यांना सोमवारी पाचारण करण्यात आले आहे. एअर मार्शल (सेवानिवृत्त) गुजराल सकाळी येथील सीबीआय मुख्यालयात तपास पथकासमक्ष हजर झाले. या हेलिकॉप्टरच्या उड्डाणासंबंधी मापदंडात आवश्यक बदल करण्याचा निर्णय २००५ च्या ज्या बैठकीत घेण्यात आला होता. त्या बैठकीला गुजरालही उपस्थित होते. या प्रकरणी २०१३ मध्ये हवाई दलाच्या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली होती. परंतु इटलीतील एका न्यायालयाने ७ एप्रिलला दिलेल्या निर्णयानंतर पुन्हा एकदा त्यांचा जाबजबाब नोंदविणे गरजेचे झाले होते. सीबीआयने आतापर्यंत गुजराल यांची एक साक्षीदार म्हणून चौकशी करण्यात आल्याचे सांगितले आहे. परंतु ते अजूनही साक्षीदारच आहेत काय हे मात्र स्पष्ट केले नाही. तपास संस्थेने अद्याप त्यांच्यावर कुठलाही आरोप केलेला नाही. याप्रकरणी त्यागी यांच्यासह अन्य १३ लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
तपास संस्थेच्या ‘अचानक’ तत्परतेबाबत आश्चर्य वाटले -त्यागी
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर लाचप्रकरणी सीबीआय चौकशीचा सामना करीत असलेले त्यागी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळताना तपास संस्थेतर्फे अचानक दाखविण्यात येत असलेल्या तत्परतेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
माजी हवाईदल प्रमुखांनी फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये माध्यमे आणि प्रामुख्याने वृत्त वाहिन्यांवर लक्ष्य साधले आहे.
अँटोनींच्या वक्तव्याला जेटलींचे आव्हान
तिरुवअनंतपुरम: अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यावरून काँग्रेसवरील हल्ला तीव्र करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या कंपनीला संपुआच्या शासनकाळात काळ्या यादीत टाकण्यात आले होते आणि रालोआ सरकारने या यादीतून हटविले हा दावा कपोलकल्पित असल्याचा आरोप शनिवारी येथे केला.
संपुआच्या शासनकाळात अगुस्ता वेस्टलँड फिनमेकेनिकाला हेलिकॉप्टर सौद्यात लाचप्रकरण उघडकीस आल्यावर काळ्या यादीत टाकण्यात आले होते या माजी संरक्षण मंत्री ए.के. अॅन्टोनी यांच्या वक्तव्याला जेटलींनी आव्हान दिले आहे.
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर सौद्यात लाचखोर कोण हे संपुआने सांगावे -पर्रीकर
डेहराडून: अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यात कुणी लाच घेतली याचे उत्तर तत्कालीन संपुआ सरकारने द्यावे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले आहे.
येथे एका कार्यक्रमासाठी आलेले पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या सौद्यात कुणी लाच घेतली हा वादाचा मुद्दा आहे. सौदा झाला त्यावेळी सत्तेत असलेल्या लोकांनी याचे उत्तर द्यावे.
१२५ कोटी रुपये देण्यात आले असल्याचे इटलीच्या न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सोबतच काही नावांचाही खुलासा केला होता.
ज्या पद्धतीने हा सौदा झाला आणि एक विशिष्ट कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाला यासंदर्भात त्यावेळी सत्तेत असलेल्या लोकांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे.