सोन्याचे दागिने घालण्यास रोखत होता इंजिनीअर पती, पत्नीनं केलं FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 03:57 PM2019-08-19T15:57:56+5:302019-08-19T15:58:22+5:30
गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अहमदाबादः गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेनं पोलीस ठाण्यात जाऊन घरगुती हिंसा आणि पती मानसिक छळ करत असल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मला पती सोन्याचे दागिने घालू देत नसल्याचा तक्रारदार पत्नीचा आरोप आहे. त्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चालल्याचंही तिनं सांगितलं आहे.
तक्रारदार महिला एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कामाला आहे. 35 वर्षांच्या या महिलेनं रविवारी अचानक पोलीस ठाणे गाठलं आणि तिनं पेशानं इंजिनीअर असलेल्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच मी सोने घालणार असल्याचं सांगितल्यावर तो धमकावत असल्याचाही पत्नीचा आरोप आहे. महिलेचं वय 35 वर्षं आहे. तर पतीचं वय 39 वर्षं असून, हे दाम्पत्य वस्त्रापूर भागात वास्तव्याला आहे.
2016मध्ये आयटी इंजिनीअर पतीशी लग्न झाल्याचं तक्रारदार पत्नीनं सांगितलं आहे. त्यांना दोन वर्षांची एक मुलगीसुद्धा आहे. तक्रारदार महिलेनं सांगितलं की, एका नातेवाईकाकडे आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्तानं गेलो होतो. त्यानंतर घरी परतल्यावर आमच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्याचदरम्यान पतीनं मला दुखापत करण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर काही दिवसांनीच आमच्यात खटके उडू लागले. त्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण आणि हाणामारी होत होती. लग्नाच्या वेळी मला माहेरहून 20 तोळे सोनं मिळाले होते. परंतु लग्नानंतर पतीनं ते परिधान करू न दिल्याचं तिने सांगितलं आहे.