भाजपवर राग मात्र विश्वास नरेंद्र मोदींवरच होता; सूरतवरची पकड आणखी मजबूत झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 06:12 AM2022-12-09T06:12:01+5:302022-12-09T06:12:28+5:30
लेवा पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व करणारे हे दोन्ही चेहरे सुरत महानगरपालिका निवडणुकीपासून भाजपला त्रासदायक ठरत होते.
शांतीलाल गायकवाड
सुरत : गुजरातमधील अहमदाबादनंतरचे दुसरे मोठे शहर व व्यापार उद्योगाचे केंद्र असलेल्या सुरतवर भाजपची पकड गुरुवारी जाहीर झालेल्या निकालाने पुन्हा मजबूत झाली आहे. दक्षिण गुजरातमध्ये भाजपने काँग्रेससह आम आदमी पार्टीलाही अक्षरश: धूळ चारली आहे. सातव्यांदा राज्याची सत्ता हाती घेणाऱ्या भाजपविषयी मतदारांत राग होताच, पण ‘मोदी हैं तो गुजरात हैं’ ही त्यांची प्रतिक्रियाही सर्व सांगून जात होती, हे निकालातून दिसलेच.
भाजपची सुरतेवरील पकड मागील २००२च्या निवडणुकांपासून आहेच. पण यावेळेस खुंटी हलवून अधिक मजबूत करतात, तशी भाजपने अधिकच सशक्त केली आहे. सुरत जिल्ह्यातून आपला विधानसभेत प्रवेशाची संधी मिळेल, अशी वर्तविलेली भाकिते मतदारांनी मतपेटीतून चुकीची ठरविली आहेत. सुरत शहरातील विधानसभेच्या कतारगाम आणि वराछा रोड या दोन जागा आप भाजपकडून खेचून घेईल, असे वाटत असतानाही भाजपने मिळविलेला एकहाती विजय हा विरोधी पक्षांना त्यांचे गुजरातेतील स्थान दाखविण्यास पुरेसे आहे. या कतारगाममधून आपचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया आणि वराछा रोडमधून प्रसिद्ध विधिज्ञ अल्पेश कथारिया या दोन लेवा पाटीदारांनी भाजपच्या नाकात दम आणला खरा, परंतु हा दम ते विजयात परावर्तित करू शकले नाहीत.
लेवा पाटीदार आंदोलनाचे नेतृत्व करणारे हे दोन्ही चेहरे सुरत महानगरपालिका निवडणुकीपासून भाजपला त्रासदायक ठरत होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींना सुरतमध्ये २५ ते ३० किलोमीटरचा रोड शो करून वराछा मतदारसंघात जाहीर सभाही घ्यावी लागली होती. या दोन्ही मतदारसंघात आपच्या उमेदवारांना भरघोस मते मिळाली आहेत.
जिथे दबदबा तिथेही घाटा
दक्षिण गुजरातेत बहुसंख्य एससी व एसटी राखीव मतदारसंघ आहेत. या राखीव मतदारसंघावर काँग्रेसचा दबदबा राहिला आहे. त्यामुळेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या दोन जाहीर सभा गुजरातेत घेतल्या त्या याच भागात; परंतु मोदींच्या झंझावातात हा दबदबाही पार पाचोळ्यासारखा उडून गेला. तापी जिल्ह्यातील दोन्ही एसटी राखीव जागा त्यामुळे भाजप जिंकू शकली. व्यारातील काँग्रेस उमेदवार पूनाभाई गामीत पाचव्यांदा नशीब अजमावत होते. ते पराभूत झाले. तेथून भाजपने दिलेले धर्मांतरीत कोंकणी हे विजयी झाले. नर्मदा ते डांग या आदिवासी पट्ट्यात भाजपचा जोर दिसून आला.