गुजराती-मराठी वाद शिवसेनेच्या पथ्यावर
By admin | Published: October 9, 2014 04:38 AM2014-10-09T04:38:07+5:302014-10-09T04:38:07+5:30
एक काळ होता जेव्हा मुंबईतील निवडणुकीची हवा आणि दिशा ही शिवाजी पार्कातील सभेनंतर ठरायची
एक काळ होता जेव्हा मुंबईतील निवडणुकीची हवा आणि दिशा ही शिवाजी पार्कातील सभेनंतर ठरायची. पण, शिवाजी पार्क शांतता क्षेत्र बनले आणि मुंबईतील अन्य मैदानांवर राजकीय फड रंगू लागले. लोकसभा निवडणुकीत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि सोमैय्या मैदानावरील सभा गाजल्या. सध्याच्या विधानसभेचा पट मांडला गेला तो महालक्ष्मी रेसकोर्सच्या पार्किंग लॉटवर. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथूनच भाजपावर हल्लाबोल करत मुंबईतील निवडणूक मराठी विरुद्ध गुजराती याच मुद्द्याभोवती फिरेल याची तजवीज केली.
मोदींमुळे स्वाभाविकपणे गुजराती मते आपल्याकडे वळतील असा भाजपा नेत्यांचा दावा आहे. म्हणूनच मुंबई शहरातील दहा जागांपैकी कुलाबा, मलबार हिल आणि मुंबादेवी येथून पक्षाने गुजराती उमेदवार मैदानात उतरविले आहेत.
मलबार हिलमध्ये भाजपा आ. मंगलप्रभात लोढांसमोर मराठी मते राखण्याचे आव्हान आहे. त्यातच स्थानिक शिवसेना खा. अरविंद सावंत यांनी आपली सारी शक्ती येथे पणाला लावल्याने मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. कुलाब्यात काँग्रेसचे आ. अॅनी शेखर विरूद्ध भाजपाचे राज पुरोहित असा सामना आहे. अॅनी शेखर यांची प्रकृती आणि त्यांच्याविरोधातील नाराजी काँग्रेससाठी चिंतेची बाब आहे. तर, मुंबादेवी अमिन पटेल वडाळ््यात कालिदास कोळंबकर आपापले गड राखण्यासाठी मैदानात उतरले आहेत. सध्या तरी येथील स्थानिक समीकरणे काँग्रेसच्या बाजूने आहेत.
भायखळ्यात आ. मधू चव्हाण यांच्यासमोर कुख्यात गुंड अरुण गवळींची कन्या गीता गवळींचे आव्हान आहे. शिवसेनेने गीता गवळींना दिलेला पाठिंबा अजून तरी शिवसैनिकांच्या पचनी पडला नाही. शिवसैनिकांना पटविण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अद्याप त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. तर, धारावीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांसमोर शिवसेनेच्या बाबुराव मानेंनी जोरदार आघाडी उघडली आहे. धारावीत आपले स्थान अबाधित राखण्यासाठी गायकवाडांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
सर्वत्र राजकीय धामधूम असली तरी सायन-कोळीवाडा मात्र अजूनही सुस्तावलेला वाटतो. काँग्रेसचे विद्यमान आमदार जगन्नाथ शेट्टींसमोर राष्ट्रवादीचे प्रसाद लाड, भाजपाचे कॅ. तमिल सिल्वन यांचे आवाहन आहे. स्थानिक दलित नेते मनोज संसारेंनी मागच्या निवडणुकीत येथून १५ हजार मते घेतली. संसारेंची मते निर्णायक ठरू शकतात.
शिवडीत बाळा नांदगावकर आणि माहिममध्ये नितीन सरदेसाई या दोन्ही मनसे आमदारांना झगडावे लागत आहे. नांदगावकरांबाबत स्थानिकांत असणारी नाराजी येथील मुख्य मुद्दा आहे. तर, माहिमची जागा परत मिळविण्यासाठी शिवसेनेने सदा सरवणकरांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न चालविले आहेत. एकूणच मनसेला आपल्या दोन्ही जागा राखताना मोठी कसरत करावी लागणार आहे. वरळीत राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांची अवस्थाही अशीच काहीशी आहे.
सुनील शिंदेना मैदानात उतरविल्याने शिवसैनिकांमध्ये काहीसे उत्साहाचे वातावरण आहे. निष्ठावंताला न्याय मिळाल्याने शिवसैनिक समाधानाची भावना व्यक्त करत असले तरी भाजपा उमेदवार सुनील राणेंमुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. येथील तिरंगी लढतीत प्रत्येक उमेदवार आपली सगळी शक्ती पणाला लावताना दिसत आहे.