गुजराती-मराठीची मनं जुळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 03:24 AM2018-02-19T03:24:59+5:302018-02-19T04:04:26+5:30
पुण्यातील सहयोगी संस्था आणि मराठी वाङ्मय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदाच प्रकाशक मेळावा देवाण-घेवाण दालनाचा प्रारंभ करण्यात आला.
स्नेहा मोरे
साहित्यनगरी (बडोदे) : पुण्यातील सहयोगी संस्था आणि मराठी वाङ्मय परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पहिल्यांदाच प्रकाशक मेळावा देवाण-घेवाण दालनाचा प्रारंभ करण्यात आला. या दालनाच्या माध्यमातून मराठी भाषेतील साहित्य संपदेचा अनुवाद गुजराती भाषेत करण्यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. संमेलनाच्या दुसºयाच दिवशी या व्यासपीठाच्या माध्यमातून अनुवादासाठी ४०-५० मराठी साहित्य कलाकृतींची निवड गुजराती प्रकाशक मंडळाने केली आहे. या साहित्य कलाकृतींचे हक्क गुजराती प्रकाशक विकत घेणार आहेत. त्यामुळे गुजराती- मराठी भाषेसाठी हे व्यासपीठ महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
गुजराती प्रकाशक मंडळाचे जवळपास ११० सदस्य आहेत. या सदस्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या वेळी, ग्रंथांच्या स्टाल्सला भेटी देऊन मराठी प्रकाशकांशी संवाद साधला. या संवादानंतर गुजराती प्रकाशक मंडळातील प्रत्येक सदस्याने साधारणत: ७ ते १० पुस्तकांची निवड केली आहे. त्यातून जवळपास अनुवादासाठी अंतिम साहित्य कृतींची निवड करण्यात येईल. या प्रक्रियेला काहीसा विलंब लागेल.
कारण, कोणतीही साहित्यकृती अनुवादित करीत असताना त्याविषयी सर्वंकशाने विचार केला जातो. त्यात त्या ग्रंथाचे विषय, वितरण, वाचकांची अभिरुची या चहूबाजूंनी विचार करून यांतील कलाकृतींवर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे, अशी माहिती आर. आर. प्रकाशन समूहाचे चिंतन शेठ यांनी सांगितले. या उपक्रमांर्गत आशिष गोरे लिखित जग फिरता फिरता भटकंती अनप्लगड् हे पहिले पुस्तक मराठीतून इंग्रजीत अनुवादित करण्यात येणार आहे. गुजरातमधील साहित्य अनुवादाविषयी शेठ यांना विचार असता ते म्हणाले की, अनुवादासाठी या ठिकाणी स्रोत कमी आहेत. त्यामुळे पूर्वी प्रकाशकांना मराठीतील साहित्यसंपदा अनुवादित करण्याची इच्छा असल्यास बºयाच अडचणींना तोंड द्यावं लागत असे.
पुण्याच्या विश्वकर्मा प्रकाशनाचे विशाल सोनी यांनी रंगद्वार प्रकाशनाची ज्ञानपीठ विजेते लेखक रघुवीर चौधरी लिखित रुद्र महालयनी कर्पूरमंजरी, लोकलीला, भारतीय संस्कृती आजना संदर्भमा, पन्नालाल पटेल लिखित पाछले बारणे, फकीरो ही पाच पुस्तके गुजरातीतून मराठीत अनुवाद करण्याचे निश्चित केले आहे. तर याशिवाय, रजनी व्यास लिखित अक्षरा प्रकाशनचे भारतनौ सांस्कृतिक इतिहास हेही पुस्तक मराठीत करणार आहे, असे सोहोनींनी सांगितले.
दळवी, साधू यांच्या साहित्याची वर्णी
जयवंत दळवी यांचे चक्र, अरुण साधू यांचे मुंबई दिनांक , कानमंत्र आई-बाबांसाठी, खरीखुरी टीम इंडिया, भारतीय जीनिअस यांच्या साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली आहे.
१५ वाचनालये, ५ ग्रंथविक्रीची दुकाने
गुजरातमध्ये दर वर्षी १५००- २ हजार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येते. त्यात गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील साहित्य सर्वाधिक आहेत.