गुलबर्ग हत्याकांड - २४ जण ठरले दोषी , ६ जून रोजी शिक्षा ठोठावणार...

By admin | Published: June 3, 2016 03:46 AM2016-06-03T03:46:54+5:302016-06-03T03:46:54+5:30

माजी खासदार इशान जाफरी यांच्यासह ६९ जणांना ठार करण्यात आलेल्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाबाबत विशेष न्यायालयाने गुरुवारी १४ वर्षांनंतर निकाल देताना हा पूर्वनियोजित कट नव्हता

Gulberg massacre - 24 people convicted, sentenced on June 6 ... | गुलबर्ग हत्याकांड - २४ जण ठरले दोषी , ६ जून रोजी शिक्षा ठोठावणार...

गुलबर्ग हत्याकांड - २४ जण ठरले दोषी , ६ जून रोजी शिक्षा ठोठावणार...

Next

अहमदाबाद : काँग्रेसचे माजी खासदार इशान जाफरी यांच्यासह ६९ जणांना ठार करण्यात आलेल्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाबाबत विशेष न्यायालयाने गुरुवारी १४ वर्षांनंतर निकाल देताना हा पूर्वनियोजित कट नव्हता, असे नमूद केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणातील ६६ पैकी २४ आरोपींना न्यायालयाने दोषी ठरविले असून, ३६ जणांची निर्दोष सुटका केली आहे. दोषींपैकी ११ जणांवर कलम ३०२ नुसार खुनाचा आरोप कायम ठेवण्यात आला असला, तरी सर्वांवरील गुन्हेगारी कटाचा आरोप वगळण्यात आला आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश पी. बी. देसाई यांनी भाजपाचे नगरसेवक बिपीन पटेल यांच्यासह ३६ जणांना निर्दोष ठरविले आहे. खटल्याच्या काळात सहा आरोपींचा मृत्यू झाला. विश्व हिंदू परिषदेचे नेते अतुल वैद्य यांच्यासह १३ जणांवर तुलनेत सौम्य गुन्हे नोंदण्यात आले. या सर्वांनी कलम १२० बी नुसार गुन्हेगारी कट रचल्यासंबंधी कोणतेही पुरावे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हिंसक हल्ल्यात मारले गेलेले माजी खासदार इशान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांनी दीर्घकाळ कायदेशीर लढा दिला. एक महिला म्हणून माझ्यात या सर्वांना फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी करण्याचे धाडस नाही; मात्र त्यांना कठोरात कठोर शिक्षा म्हणजे जन्मठेप व्हायलाच हवी, असे त्या म्हणाल्या. न्यायालयाच्या निर्णयावर असमाधान व्यक्त करताना झाकिया जाफरी यांनी आपण या निर्णयाला आव्हान देणार आहोत, असे सांगितले.(वृत्तसंस्था)


मी या निर्णयावर समाधानी नाही. मला तो आवडलेला नाही. जे केले त्यासाठी सर्वांना शिक्षा द्यायला हवी होती. मला हे सर्व माहीत आहे. मी नरसंहार होताना बघितला आहे. सर्वांनाच दोषी ठरविले जाईल, अशी माझी अपेक्षा होती. त्यांनी लोकांना कसे मारले, त्यांना कसे बेघर बनविले ते मी माझ्या डोळ्याने बघितले आहे.
- झाकिया जाफरी, माजी खासदार इशान जाफरी यांच्या पत्नी.
.....................................
४०० जणांचा जमाव दंगलीत सहभागी असताना केवळ २४ जणांनाच दोषी का ठरविण्यात आले?
उर्वरित ३६ जण मोकळे कसे सुटले या प्रश्नावर आम्ही वकिलांशी सल्लामसलत करणार असून त्यानंतर पुढील डावपेच ठरविले जाईल. हा माझे कुटुंब, शेजारी आणि सोसायटीतील अन्य रहिवाशांसाठी कठीण काळ होता. आम्ही कायदेशीर लढाईसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले .
- तनवीर जाफरी, इशान जाफरी यांचे पुत्र
------------------------------
------------------------------
-----------------------
निर्णय स्वागतार्ह- काँग्रेस...
गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाबद्दल न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. हे दीर्घकाळापासूनचे प्रकरण असून अखेर न्याय दिला गेला. आरोप- प्रत्यारोप झाले होते. शेवटी न्याय मिळाला यावर आमचा विश्वास आहे. मी अद्याप निर्णय पूर्णपणे वाचलेला नाही. पीडितांना अंतिम न्याय दिला गेला अशी मला आशा असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वड्डकन यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांसह
३४ जण निर्दोष...
असर्वा येथील भाजपाचे विद्यमान आणि तत्कालीन नगरसेवक बिपीन पटेल, काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक मेघसिंग चौधरी, तत्कालीन पोलीस निरीक्षक के.जी. इरडा यांचा निर्दोष ठरविलेल्यांमध्ये समावेश आहे. पटेल यांनी गेल्या वर्षी लागोपाठ चौथ्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली आहे.

अल्पसंख्य समुदायातील लोकांना ठार मारण्यासाठी जमावाने पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप पीडितांच्या वकिलांनी केला होता. जाफरी यांनी बंदुकीच्या अनेक फैरी झाडल्यानंतरच जमाव संतप्त झाला होता, असा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी गुन्हेगारी कटाचा आरोप फेटाळताना केला.

दोषी ठरलेल्यांना ६ जून रोजी शिक्षा ठोठावली जाणार आहे. अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या गुलबर्ग सोसायटीवर ४०० जणांचा जमाव चालून गेला.

काँग्रेसचे जाफरीसह ६९ जण या हल्ल्यात मारले गेले. २००२ च्या गुजरात दंगलींबाबत एसआयटीने केलेल्या तपासांतली नऊ प्रकरणांमध्ये या हत्याकांडाचा समावेश होता.

समाजकंटकांनी २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोधरा स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसचा एस-६ हा डबा पेटवून दिल्यामुळे ५८ कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर गुजरातमध्ये दंगली भडकल्या होत्या.

Web Title: Gulberg massacre - 24 people convicted, sentenced on June 6 ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.