Jinnah Tower: जिन्ना टॉवर वाद! वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर टॉवरला मारला तिरंगा रंग; नाव बदलण्यावर भाजप ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 01:02 PM2022-02-02T13:02:10+5:302022-02-02T13:02:22+5:30
आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात असलेल्या एका मिनाराला पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नांचे नाव देण्यात आले आहे. भाजपने हे नाव बदलून एपीजे एब्दुल कलामांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
गुंटूर:आंध्र प्रदेशातीलगुंटूर येथील वादग्रस्त जिन्ना टॉवरला अखेर तिरंगा रंगात रंगवण्यात आले आहे. तसेच, गुरुवारी या टॉवरजवळ राष्ट्रध्वज फडकवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. गुंटूर पूर्वचे आमदार मोहम्मद मुस्तफा म्हणाले की, विविध गटांच्या विनंतीवरून टॉवरला तिरंग्याने रंगवण्याचा आणि राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तानचा संस्थापक मोहम्मद अली जिन्नाची आठवण करुन देणाऱ्या टॉवरचे नाव बदलण्यात यावे, असा पवित्रा भाजपने घेतला आहे.
गुंटूर शहराच्या महापौर कवेती मनोहर यांनी टॉवरच्या नावावरुन राजकारण करत असल्याचा आरोप भाजपवर केला आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या काही आठवड्यांपासून भाजपचे कार्यकर्ते या टॉवरबाबत विनाकारण वाद निर्माण करत आहेत. आम्ही परिसरातील मुस्लिम ज्येष्ठांशी बोललो असून टॉवरशेजारी राष्ट्रध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, केवळ टॉवरचा रंग बदलून आम्ही शांत होणार नाहीत, असे भाजपने स्पष्ट केले आहे.
टॉवरला एपीजे अब्दुल कलामांचे नाव द्या
आंध्र प्रदेश भाजपचे प्रभारी सुनील देवधर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, जिन्ना टॉवरचे नाव बदलेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे. बुरुज तिरंग्याच्या रंगात रंगला, हे ठीक आहे पण त्याचे नावही बदलले पाहिजे. जिन्ना हे पाकिस्तानचे संस्थापक आहेत आणि ते भारताच्या दडपशाहीचे प्रतीक होते. जिन्ना आणि औरंगजेब यांच्यात काही फरक नाही. ज्याप्रमाणे औरंगजेब रोडचे नामकरण करण्यात आले, त्याचप्रमाणे या जिन्ना टॉवरचे नामकरण एपीजे अब्दुल कलाम टॉवर असे करण्यात यावे, असे ते म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
आंध्र प्रदेशातील गुंटूर शहरात पाकिस्तानचा संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या नावाचे एक टॉवर आहे. या टॉवरच्या नामांत्तराचा मुद्दा भाजपने उचलून धरला आहे. आंध्र प्रदेश सरकारने तात्काळ जिन्ना टॉवरचे नाव बदलून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव त्या टॉवरला द्यावे, अशी मागणी भाजपने केली आहे.
टॉवरचा इतिहास?
असे म्हटले जाते की, स्वातंत्र्य काळापासून गुंटूर शहरात हे टॉवर उभे आहे. 1945 मध्ये फाळणीपूर्वी मोहम्मद अली जिन्ना एका सार्वजनिक सभेला संबोधित करण्यासाठी गुंटूरला आले होते. त्यावेळी काही स्थानिक मुस्लिमांनी त्यांना भेट देण्याच्या उद्देशाने या टॉवरचे नाव जिन्ना यांच्या नावावर ठेवले. या टॉवरला घुमटाच्या आकाराची रचना असलेले सहा खांब आहेत आणि स्थानिक लोक या टॉवरला सौहार्द आणि शांततेचे प्रतीक मानतात. या परिसराला सध्या जिन्ना सेंटर म्हणून ओळखले जाते.