गुपकार आघाडी, काँग्रेस काश्मिरात येणार एकत्र, १३ जिल्हा पंचायती ताब्यात घेण्यासाठी हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 01:08 AM2020-12-24T01:08:29+5:302020-12-24T01:09:40+5:30
Kashmir : कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. २० जिल्ह्यांतील एकूण २८० जागांसाठी मतदान झाले होते.
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीत गुपकार आघाडीने शंभरहून अधिक जागा जिंकून मोठे यश मिळविले आहे. काँग्रेसनेही समाधानकारक कामगिरी केली आहे. आता जिल्ह्यात सत्ता स्थापनेसाठी गुपकार आघाडी आणि काँग्रेस एकत्र येणार असून, दोन्ही मिळून १३ जिल्ह्यांत सत्ता स्थापन करणार आहेत, तर भाजपकडे ७ जिल्ह्यांतील सत्ता येणार आहे.
कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. २० जिल्ह्यांतील एकूण २८० जागांसाठी मतदान झाले होते. त्यापैकी २७८ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
गुपकार आघाडीने यातील ११० जागा जिंकल्या आहेत. भाजपने ७५ तर काँग्रेसने २६ जागांवर विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे, अपक्षांनीही ४९ जागांवर बाजी मारली आहे. गुपकार आघाडीला काश्मीरमध्ये ८४ जागा जिंकून अपेक्षेप्रमाणे यश मिळाले आहे, परंतु हिंदुबहुल जम्मू प्रांतात आघाडीने ३५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने १० ठिकाणी विजय मिळविला आहे. दुसरीकडे भाजपला काश्मीर प्रांतात केवळ ३ जागा मिळाल्या आहेत.
जम्मूमध्ये १४० जागांपैकी भाजपने ७२ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने १६ तर अपनी पार्टीने ३ जागा जिंकल्या आहेत. या एकूण निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. नॅशनल कॉन्फरन्सने ६७, पीडीपीने २७ आणि काँग्रेसने २६ जागा जिंकल्या आहेत. (वृत्तसंस्था)
काश्मीरमध्ये आम्हाला समर्थन - ओमर अब्दुल्ला
जम्मू प्रांतात गुपकार आघाडीने मिळविलेल्या विजयावरून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या जनतेने भाजपला उत्तर दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आम्हाला संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये समर्थन आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.
फुटीरतावाद्यांना जनतेने दिले उत्तर - रविशंकर प्रसाद
भाजपला ४.५ लाख मते मिळाली असून, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसला मिळालेल्या मतांपक्षाही हा आकडा जास्त असल्याचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना जम्मू आणि काश्मीरच्या जनतेने मतदानातून उत्तर दिल्याचे ते म्हणाले.