जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर पंतप्रधानांसाेबतच्या बैठकीत गुपकर आघाडी हाेणार सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 06:32 AM2021-06-23T06:32:00+5:302021-06-23T06:32:31+5:30
आघाडीची भूमिका : फारुख अब्दुल्लांच्या उपस्थितीत झाला निर्णय
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरसंबंधी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी बाेलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गुपकर आघाडीने सहभागी हाेण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्त्वात आघाडीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान माेदी यांनी बाेलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी हाेण्याचे गुपकर आघाडीला आमंत्रण देण्यात आले हाेते. त्यात सहभागी हाेण्याबाबत आघाडीची दुसरी बैठक झाली. त्यात पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्तीदेखील सहभागी झाल्या हाेत्या. पंतप्रधानांनी बाेलाविलेल्या बैठकीत मेहबूबा मुफ्ती, माेहम्मद तारीगामी साहेब आणि मी सहभागी हाेणार असल्याचे अब्दुल्ला यांनी सांगितले. संपूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची प्रमुख मागणी राहणार आहे.
संपूर्ण राज्याचा दर्जा हाच अजेंडा : आझाद
जम्मू आणि काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा देणे हाच बैठकीचा प्रमुख अजेंडा राहणार असल्याचे काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. मात्र, विशेष दर्जाच्या मागणीबाबत त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले नाही. जम्मू आणि काश्मिरातील काॅंग्रेस नेत्यांसाेबतही याबाबत चर्चा करणार असून, त्यानंतर पक्षश्रेष्ठींचेही मार्गदर्शन घेणार असल्याचे आझाद यांनी सांगितले. दरम्यान, काॅंग्रेसच्या जम्मू आणि काश्मीर धाेरण आखणी गटाच्या बैठकीत पक्षाच्या भूमिकेबाबत अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.