‘सर्जिकल स्ट्राइक्स’चे पुरावे राहणार गुप्तच
By Admin | Published: October 7, 2016 01:56 AM2016-10-07T01:56:42+5:302016-10-07T01:56:42+5:30
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे (सर्जिकल स्ट्राइक्स) पुरावे सादर केले जाणार नाहीत,
हरीश गुप्ता/नवी दिल्ली
पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचे (सर्जिकल स्ट्राइक्स) पुरावे सादर केले जाणार नाहीत, असे मोदी सरकारने स्पष्ट केले. काँग्रेससह काही राजकीय पक्षांनी या स्ट्राइक्सचे पुरावे समोर मांडा अशी मागणी केल्यापासून राष्ट्रीय पातळीवर वाद सुरू झाला आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमात त्या कारवाईचा कोणताही पुरावा (व्हिडीओ चित्रीकरण) सादर करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले. सुरक्षेवरील उच्चाधिकार समितीचे पर्रीकर हे सदस्य असून, प्रथमच त्यांनी पुरावे सादर करण्यात येणार नाहीत, ही सरकारची भूमिका स्पष्ट केली. आतापर्यंत केवळ अधिकृत सूत्रांचाच हवाला दिला जात होता. एवढेच काय, लष्करानेही कोणतेही भाष्य पुरावे सादर करण्याच्या विषयावर केलेले नाही. आम्ही ९० मिनिटांचे व्हिडीओ फुटेज सरकारकडे सादर केले असून, निर्णय सरकारने घ्यायचा आहे, असे स्पष्ट केले होते.
पर्रीकर यांनीच ही भूमिका स्पष्ट केल्यामुळे, सरकार सर्जिकल स्ट्राइक्सचे व्हिडीओ फुटेज सादर करणार नाही. २९ सप्टेंबर रोजी लष्कराच्या विशेष दलांनी हे सर्जिकल स्ट्राइक्स पार पाडले, याबद्दल खूप छाती फुगवायचीही गरज नसल्याचे मोदी यांनी त्यांना सांगितले होते. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच पर्रीकर यांनी जाहीरपणे वरील भूमिका स्पष्ट केली, हे स्पष्ट आहे. मथुरेमध्ये पर्रीकर यांचा जाहीर सत्कार झाला. त्यात बोलताना त्यांनी कदाचित सरकारी मर्यादा ओलांडली असावी, परंतु व्यापक अर्थाने ते मोदी यांच्या सांगण्यानुसार वागले आहेत. सूत्रांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत फोटो क्लिप जाहीर केली जाऊ शकते, परंतु हा पर्यायही सरकारसमोर खूपच अडचणी निर्माण झाल्या तरच वापरला जाईल.
..त्याची गरज नाही
या कारवाईचा भाजपा राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याची राजकीय विरोधकांकडून होणारी टीका पर्रीकर यांनी फेटाळली. माझा जर जाहीर सत्कार होत असेल, तर तो माझा नसून लष्कराचा आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाचा आहे, असेही ते म्हणाले. लष्कराबद्दल ज्यांनी संशय व्यक्त केला आणि सर्जिकल स्ट्राइक्सच्या पुराव्यांची मागणी ज्यांनी केली, त्यांच्या निष्ठेबद्दल पर्रीकर यांनी प्रश्न विचारला. इंग्लिश वृत्त वाहिनीने पाकिस्तानी पोलीस अधिकारी सर्जिकल स्ट्राइक्स झाल्याचे कबूल करतानाची व्हिडीओ क्लिप दाखविली, याचा उल्लेख करून पर्रीकर म्हणाले, ‘व्हिडीओ फुटेज दाखवायचे किंवा कोणताही पुरावा द्यायची आता काय गरज आहे?’दहशतवादी गुजरातमध्ये घुसले?
नवी दिल्ली : गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे संपूर्ण राज्यभर हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा इंटर स्टेट इंटलिजन्सच्या (आयएसआय) पाठिंब्याने दहशतवाद्यांनी गुजरातमध्ये घुसखोरी केली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. नवरात्र उत्सव गुजरातमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने, सर्व मंदिरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. द्वारका मंदिरावर
हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेता, तेथील पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.
गुजरातमध्ये १२ ते १५ संशयित दहशतवादी समुद्रामार्गे घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाल्याचे सांगण्यात येते. आयएसआयने या दहशतवाद्यांना पाठवले असल्याची शंका आहे. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानकडून हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता, चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. दोनच दिवसांपूर्वी गुजरातच्या समुद्रामध्ये संशयास्पद बोटदेखील सापडली होती.
‘स्ट्राइक्स’विषयी शंका घेणारे देशाशी एकनिष्ठ आहेत का?
च्मी सरळ विचार करणारा माणूस आहे, पण देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आला की, मी वाकडाही विचार करू शकतो, असे सांगतानाच, सर्जिकल स्ट्राइक्सबद्दल शंका उपस्थित करणारे देशाशी एकनिष्ठ आहेत का, असा कधी-कधी संशय
येतो, असे उद्गार केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे काढले.
च्भारताने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर पहिल्यांदाच मनोहर पर्रीकर जाहीर सभेत बोलत होते. या वेळी सर्जिकल स्ट्राइक्समध्ये भारताचा जवान शहीद तर सोडाच, पण जखमीही झाला नाही,
असे फार कमी वेळा होते, असे सांगतानाच, सर्जिकल स्ट्राइक्सविषयी शंका उपस्थित करणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
च्संरक्षणमंत्री असल्याने आपण अनेक गोष्टी बोलू वा सांगू शकत नाही, असे सांगत पर्रीकर यांनी
भाषण थोडक्यात आटोपले, पण देशाच्या संरक्षणासाठी आपण मोदी यांच्या नेतृत्वाखाली काहीही करायला तयार आहोत, असे सांगायला ते विसरले नाहीत. उत्तर प्रदेशात पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपाने तर मुख्यालयात नरेंद्र मोदी आणि मनोहर पर्रीकरांचा लष्कराच्या जवानांसोबत फोटो लावून अभिनंदनही केले.
च्पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश व देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. त्यांची चिंता कोणीही करू नये. भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल आतापर्यंत कोणीच शंका व्यक्त केली नव्हती. या वेळी पहिल्यांदाच काही लष्कराच्या कामगिरीविषयी प्रश्न उपस्थित करीत आहेत, अशी टीका पर्रीकर यांनी विरोधकांवर केली. उरी हल्ल्यानंतर आणि सर्जिकल स्ट्राइक्सनंतर मला झोप लागली नव्हती, असेही त्यांनी बोलून दाखविले.
च्उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान वारंवार युद्धाची भाषा करत होता. त्यानंतर, मला काही माजी सैनिकांचे, लष्करी अधिकाऱ्यांचे ई-मेल्स आले. त्यामध्ये त्यांनी, तुम्ही चिंता करू नका, गरज असल्यास आम्ही युद्धासाठी सीमेवर जाण्यास आम्ही तयार आहोत, असे नमूद केले आहे, याचा उल्लेख करून, संरक्षणमंत्र्यांनी भारतीय सैन्यातील आजी व निवृत्त सैनिक आणि अधिकारी यांचे कौतुक केले.
अतिरेक्यांविरोधात पाकची कारवाई
च्जगभरात एकाकी पडण्याच्या धास्तीने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराला, बंदी घालण्यात आलेल्या जैश- ए-मोहम्मदसह अन्य दहशतवादी संघटनांना पाठीशी घालून नका, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
च्पठाणकोटमधील दहशतवादी हल्ला आणि २००८ मधील मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटल्यांची सुनावणी पूर्ण करण्याचेही स्पष्ट निर्देश देत, अभूतपूर्व पाऊल उचलले आहे.
च्भारताने पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे एकाकी पडण्याची पाकिस्तानला धास्ती वाटत आहे. अलीकडेच भारतासह पाच देशांनी सार्क शिखर परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.