गुरुदासपूरमध्ये शोधमोहीम सुरू
By admin | Published: January 7, 2016 12:06 AM2016-01-07T00:06:05+5:302016-01-07T00:06:05+5:30
पंजाबवरील अतिरेकी हल्ल्याचे सावट अद्यापही कायम आहे. राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील तिबरी या छावणी भागात लोकांनी लष्कराच्या पोशाखातील
गुरुदासपूर : पंजाबवरील अतिरेकी हल्ल्याचे सावट अद्यापही कायम आहे. राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातील तिबरी या छावणी भागात लोकांनी लष्कराच्या पोशाखातील दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली टिपल्यानंतर बुधवारी येथे अलर्ट जारी करण्यात आला. यानंतर लगेच पोलीस व लष्कराने शोधमोहीमही हाती घेतली.
तिबरी हे छावणी क्षेत्र आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही गावकऱ्यांनी तिबरीच्या आजूबाजूला लष्कराच्या वेशातील दोघांना संशयास्पद स्थितीत फिरताना पाहिले.
गावकऱ्यांकडून याबाबत सूचना मिळताच, पोलिसांनी लष्कराला माहिती दिली. यानंतर या संपूर्ण भागात संयुक्त शोधमोहीम सुरू झाली. तूर्तास या छावणी क्षेत्रात अती सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)
पठाणकोट : असा झाला खात्मा
पठाणकोट : पठाणकोट एअरबेसवरील सर्व सहा अतिरेकी ठार झाले असले तरी बुधवारीही सुरक्षा दलांचे ‘सर्च आॅपरेशन’सुरूच होते. सहाही अतिरेकी सतत गोळीबार आणि हातगोळे डागत असतानाच राष्ट्रीय सुरक्षा गार्डने (एनएसजी) गार्डस् व लष्कराच्या मदतीने त्यांचा खात्मा करण्यासाठी पावलोपावली ‘सर्जिकल आॅपरेशन’ राबवले. २५० मीटरच्या टप्प्यात अतिरेक्यांना घेरण्याची एनएसजीची योजना होती आणि ती यशस्वी ठरली.
अतिरेकी हल्ल्यानंतर चार दिवस ‘ओलिस’ राहिलेल्या पठाणकोट हवाईतळावर अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. याशिवाय अतिरेकी हल्ल्याच्या तपासाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या मते, पुढील एक वा दोन दिवस ते सुरू राहण्याची शक्यता आहे. अतिरेक्यांना ठार करणे अतिशय आव्हानात्मक होते. कारण एकीकडे सुरक्षा दलास एअरबेसवरील कुटुंबे, हवाईदलाची संपत्ती आणि इमारतींना धक्का लागू द्यायचा नव्हता, तर दुसरीकडे अतिरेक्यांना एका विशिष्ट भागात घेरून ठार करायचे होते. यासाठी गार्डस्, हवाईदलाचे विशेष दल आणि लष्कराने विशिष्ट ठिकाणी प्रत्येक पावलागणिक सर्जिकल आॅपरेशन राबवले आणि सहाही अतिरेक्यांना कंठस्नान घातले. या आॅपरेशनमध्ये देशाने आपले सात जवानही गमावले. (वृत्तसंस्था)
पठाणकोट हवाईतळावर अतिरेक्यांविरुद्ध राबवण्यात आलेले अभियान सर्वाधिक यशस्वी असल्याचा दावाही भाजपने केला.
भाजप सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले की, पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा फोन आला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी बोलून दाखवली. मुंबई अतिरेकी हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानकडून अशी कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. मोदींनी पाकिस्तानकडे पठाणकोट हल्ल्याप्रकरणी निर्णायक कारवाई करण्याची मागणी केली. शरीफ यांनीही त्यांना कारवाईचे आश्वासन दिले, असे ते म्हणाले.