गुरमेहर कौरने घेतली आंदोलनातून माघार
By admin | Published: February 28, 2017 10:24 AM2017-02-28T10:24:33+5:302017-02-28T10:27:31+5:30
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध मोहीम छेडणाऱ्या गुरमेहर कौरने आंदोलनातून माघार घेतली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध मोहीम छेडणाऱ्या गुरमेहर कौरने आंदोलनातून माघार घेतली आहे. गुरमेहर कौर दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी असून तिने रामजस कॉलेजमध्ये सुरु असलेल्या देशभक्ती आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मोर्चात आपण सहभागी होत नसल्याचं गुरमेहर कौरने ट्विट करुन सांगितलं आहे. 'मी मोहिमेतून माघार घेत आहे. सर्वांचं अभिनंदन. मला एकटीला सोडावं अशी विनंती करते. मला जे बोलायचं होतं, ते मी बोलले आहे', असं ट्विट गुलमेहरने केलं आहे. यावेळी तिने इतर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही केलं आहे.
गेल्या बुधवारी डीयूमध्ये उमर खालीद आणि शहला रशीद यांना बोलावले होते. त्यातून अभाविप व एआयएसए यांच्यात वाद होऊन विद्यापीठात राडा झाला होता. निरपराध विद्यार्थ्यांना मारहाण, तसेच विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी देण्याचे प्रकार घडले होते. यामुळे संतप्त गुरमेहरने सोशल मीडियावर ‘मी अभाविपला घाबरत नाही’ ही मोहीम सुरू केली.
गुरमेहर कौरने सोशल मीडियावर मोहीम सुरु केल्यानंतर तिला बलात्काराची धमकी देण्यात आली होती, ज्यानंतर दिल्ली विद्यापीठातील (डीयू) वाद चिघळला होता. भाजपा नेत्यांनी गुरमेहरला लक्ष्य केल्यानंतर विरोधी नेते तिच्या बचावासाठी धावले आहेत, तर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेण रिजिजू यांनी गुरमेहरचे मन कोणी प्रदूषित केले, असा सवाल केला, तर काही भाजपा नेत्यांनी या तरुणीपेक्षा दाऊद इब्राहिम बरा, या पातळीवर जात टीका केली.
रामजस कॉलेजमध्ये झालेल्या हिंसेवर गुरमेहर कौरने सोशल मीडियावर कॅंपेन सुरू करत एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये गुरमेहरच्या हातात असलेल्या एका पोस्टरवर ''माझ्या वडिलांना पाकिस्तानने नाही तर युद्धाने मारलं'' असं लिहीलेलं होतं. गुरमेहरचे वडिल कारगिल युद्धात शहीद झाले होते. यानंतर गुरमोहर चर्चेत आली होती. यानंतर सेहवागने गुरमोहरच्या या ट्विटला उत्तर दिलं होतं. 'मी दोन वेळेस त्रिशतक झळकावलं नाही तर माझ्या बॅटने त्रिशतक झळकावलं', असं खिल्ली उडवणारं ट्विट सेहवागने केलं.
अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलेल्या टिप्पणीबद्दल काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. डीयूत शिकत असलेली गुरमेहर कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मंदीपसिंग यांची मुलगी आहे. दरम्यान, गुरमेहरने तक्रार दिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
गुरमेहरच्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, भाजपा नेत्यांनी तिला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बलात्काराच्या धमक्या दिल्याची तक्रार गुरमेहरने सोमवारी दिल्ली महिला आयोगाकडे केली. त्यानंतर, आयोगाने गुरमेहरला पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना दिल्या. गुरमेहरने तिच्या तक्रारीत पुरावे म्हणून बलात्काराच्या धमकीचे स्क्रीनशॉट दिले आहेत.
सेहवागने केली टिंगल
गुरमेहरने गेल्या आठवड्यात फेसबुकवर, ‘मी दिल्ली विद्यापीठाची एक विद्यार्थिनी आहे. मला अभाविपची भीती वाटत नाही. भारताचा प्रत्येक विद्यार्थी माझ्यासोबत आहे,’ हा मेसेज टाकताच, वर्गमित्र आणि इतर विद्यार्थ्यांनी तिची पोस्ट शेअर केली, पण माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा आदींनी तिची ‘राजकीय प्यादे’ अशी संभावना केली. सेहवागने तर तिची टिंगलच केली.
त्यावर ती म्हणाली, ‘त्यांनी माझी देशभक्तीची कल्पना समजलेली नाही. शिवाय ही राजकीय चळवळ नाही. हा मुद्दा विद्यार्थ्यांशी आणि आमचा परिसर हिंसक धमक्यांपासून मुक्त करण्याशी संबंधित आहे. कोणीही कोणाला बलात्काराची धमकी देऊ शकत नाही.’
दाऊद बरा : भाजपा नेते
भाजपाचे खासदार प्रताप सिन्हा यांनी, ‘गुरमेहरपेक्षा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बरा,’ या भाषेत तिच्यावर टीका केली.
काँग्रेसचा भाजपावर हल्ला
भाजपा नेत्यांनी कारगिल शहिदाच्या मुलीविरुद्ध वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याबद्दल काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका केली. रिजिजू आणि सिन्हा यांची विधाने फॅसिस्ट मानसिकतेचे परिपूर्ण उदाहरण आहे. एखाद्या व्यक्तीचे विचार कदाचित तुम्हाला पटणार नाहीत. म्हणून मग धमक्या देणे योग्य नाही. हे प्रकार लोकशाहीत बसणारे नाहीत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली.