गुरमेहर कौरचा दिल्ली सोडण्याचा निर्णय
By admin | Published: February 28, 2017 01:30 PM2017-02-28T13:30:49+5:302017-02-28T13:42:40+5:30
गुरमेहर कौरने बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अखेर दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध मोहीम छेडणाऱ्या गुरमेहर कौरने बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अखेर दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गुलमेहर कौरच्या मित्राने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी गुलमेहर कौरला धमकी दिल्याप्रकरणी एफआयआर नोंद करुन घेतला असून चौकशी सुरु केली आहे. गुलमेहरला सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
गेल्या बुधवारी डीयूमध्ये उमर खालीद आणि शहला रशीद यांना बोलावले होते. त्यातून अभाविप व एआयएसए यांच्यात वाद होऊन विद्यापीठात राडा झाला होता. निरपराध विद्यार्थ्यांना मारहाण, तसेच विद्यार्थिनींना बलात्काराची धमकी देण्याचे प्रकार घडले होते. यामुळे संतप्त गुरमेहरने सोशल मीडियावर ‘मी अभाविपला घाबरत नाही’ ही मोहीम सुरू केली.
वादानंतर अखेर गुरमेहर कौरने रामजस कॉलेजमध्ये सुरु असलेल्या देशभक्ती आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मोर्चात आपण सहभागी होत नसल्याचं गुरमेहर कौरने ट्विट करुन सांगितलं आहे. 'मी मोहिमेतून माघार घेत आहे. सर्वांचं अभिनंदन. मला एकटीला सोडावं अशी विनंती करते. मला जे बोलायचं होतं, ते मी बोलले आहे', असं ट्विट गुलमेहरने केलं आहे. यावेळी तिने इतर विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही केलं आहे.
'भीतीपोटी गुरमेहरला दिल्ली सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. भारतासारख्या देशात अशा घटना घडणं निंदणीय आहे. सोशल मीडियावरुन धमक्या देणाऱ्यांना या गोष्टीचा आता अभिमान वाटत असेल', असं गुरमेहरच्या मित्राने म्हटलं आहे.
एकीकडे विरेंद्र सेहवाग आणि रणदीप हुडा यांनी गुरमेहर कौरच्या ट्विटला विरोध करत खिल्ली उडवली असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही गुरमेहरला पाठिंबा दिला आहे. भीती आणि छळाच्या विरोधात आम्ही विद्यार्थ्यांसोबत आहोत. असहिष्णुता, राग आणि अज्ञानतोविरोधात प्रत्येक ठिकाणी एक गुरमेहर उभी राहील, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.
गुरमेहर कौरने सोशल मीडियावर मोहीम सुरु केल्यानंतर तिला बलात्काराची धमकी देण्यात आली होती, ज्यानंतर दिल्ली विद्यापीठातील (डीयू) वाद चिघळला होता. भाजपा नेत्यांनी गुरमेहरला लक्ष्य केल्यानंतर विरोधी नेते तिच्या बचावासाठी धावले आहेत, तर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेण रिजिजू यांनी गुरमेहरचे मन कोणी प्रदूषित केले, असा सवाल केला, तर काही भाजपा नेत्यांनी या तरुणीपेक्षा दाऊद इब्राहिम बरा, या पातळीवर जात टीका केली.