गुरुमीत राम रहीमवरील खटल्याचा आज निकाल ! अनुयायांना पंचकुलातून घरी परतण्याचे रहीमचे आवाहन, सिरसामध्ये संचारबंदी लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 08:54 AM2017-08-25T08:54:37+5:302017-08-25T08:58:33+5:30

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहीम यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाच्या खटल्याचा निकाल आज लागणार आहे. त्यांना शिक्षा झाल्यास त्यांच्या अनुयायांनी गोंधळ करू नये, यासाठी पंजाब व हरियाणा राज्यांनी तसेच चंदिगडमधील काही भागात लष्कर दाखल झाले आहे.

Gurmeet Ram Rahim case today! Appeal appeals to the followers to return from Panchkula, curfew imposed in Sirsa | गुरुमीत राम रहीमवरील खटल्याचा आज निकाल ! अनुयायांना पंचकुलातून घरी परतण्याचे रहीमचे आवाहन, सिरसामध्ये संचारबंदी लागू

गुरुमीत राम रहीमवरील खटल्याचा आज निकाल ! अनुयायांना पंचकुलातून घरी परतण्याचे रहीमचे आवाहन, सिरसामध्ये संचारबंदी लागू

googlenewsNext
ठळक मुद्दे पंचकुला कोर्ट परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात पंजाबकडे येणा-या 74 ट्रेन्स रद्दअनुयायांनी पंचकुलातून आपापल्या घरी जावे - गुरुमीत राम रहीम

चंदिगड, दि. 25 -  डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहीम यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाच्या खटल्याचा निकाल आज लागणार आहे. त्यांना शिक्षा झाल्यास त्यांच्या अनुयायांनी गोंधळ करू नये, यासाठी पंजाब व हरियाणा राज्यांनी तसेच चंदिगडमधील काही भागात लष्कर दाखल झाले आहे. प्रशासनाच्या वतीने पंजाब व हरियाणा राज्यांतील रेल्वे व बससेवा तीन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. 

गुरमीत राम रहीम यांचं आवाहन  
दरम्यान गुरमीत राम रहीम यांनी आपल्या अनुयायांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ त्यांनी जारी केला आहे. 'मी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन करतो आहे. पंचकुलामध्ये न येण्याचेही मी आवाहन केले होते. जे डेराप्रेमी पंचकुला येथे दाखल झाले आहेत त्यांनी कृपा करुन आपापल्या घरी परतावे. मी स्वतः कोर्टात जाणार आहे. आपणा सर्वांना न्यायालयाचा सन्मान केला पाहिजे.', असे गुरमीत राम रहीम यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.  





दरम्यान,  डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमीत राम रहीम यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाच्या खटल्याचा निकालाच्या पार्श्वभूमीवर पंजाबकडे जाणा-या सर्व गाड्या रेल्वेने रद्द केल्या आहेत. दोन्ही राज्यांतील सर्व शिक्षणसंस्थांना सुटी जाहीर करण्यात आली असून, इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद केली आहे. सिरसा, चंदिगढ व पंचकुला या भागांना लष्करी छावण्यांचे रूप आले आहे. दोन्ही राज्यांच्या सर्व जिल्हाधिका-यांना जिल्ह्याबाहेर न जाण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यांनी प्रसंगी १४४ कलम लागू करावे, अशाही सूचना आहेत.  या दोन्ही राज्यांत सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त असून, राखीव सशस्त्र पोलीस दलेही तैनात करण्यात आली आहेत. तेथे प्रसंगी लष्कराला पाठवण्याची तयारीही केंद्राने ठेवली आहे. मात्र केंद्राकडून पुरेशी कुमक मिळाली नसल्याची तक्रार पंजाब सरकारने केली आहे. चंदिगढमध्ये येणा-या वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. डेरा सच्च सौदाचा मुख्य आश्रम सिरसा येथे असून, तेथे गुरुवारीच १४४ कलम जारी करून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. चंदिगढहून २५0 किलोमीटरवर असलेल्या सिरसामध्ये आतापर्यंत राम रहीम यांचे एक लाखाहून अधिक अनुयायी जमले आहेत. तेथे अभूतपूर्व बंदोबस्त आहे.

सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्ग तसेच अन्य रस्त्यांवर नाकेबंदी करण्यात आली असून, लोकांना सिरसा व चंदिगढ येथे जाण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे. सर्व वाहनांची तसेच प्रवास करणा-यांची झडतीही घेतली जात आहे. राम रहीम यांचे अनुयायी हिंसाचार करतील, अशी भीती असल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत. तसेच ठिकठिकाणी छापेही घालण्यात येत आहेत. पंचकुलातील चौधरी देवीलाल स्टेडियम, सिरसा येथील दलबीर सिंग स्टेडियम यांचे तात्पुरत्या तुरुंगांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.
राम रहीमविषयी
गुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४00 पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदा पंथाच्या बेकायदा कामाविषयी वृत्तपत्रात लिखाण करणा-या पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असे बोलले जाते. शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्याने त्या समाजाने संताप व्यक्त केला होता.
शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण : राम रहीम यांच्यावरील चित्रपटातील बराच भाग आक्षेपार्ह असल्याने त्यास संमती देण्यास सेन्सॉर बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष लीला सॅमसन यांनी २0१५ साली नकार दिला होता. त्या चित्रपटास संमती द्यावी, यासाठी केंद्र सरकार आपल्यावर दबाव आणत आहे, अशी तक्रारही श्रीमती सॅमसन यांनी केली होती. राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयाने त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते.

Web Title: Gurmeet Ram Rahim case today! Appeal appeals to the followers to return from Panchkula, curfew imposed in Sirsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा