निवडणुकीपूर्वी राम रहीमला 21 दिवसांची फर्लो मंजुर, राज्यातील 69 मतदारसंघात आहे मोठा प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:48 PM2022-02-07T12:48:14+5:302022-02-07T15:55:20+5:30
पंजाबमधील 23 जिल्ह्यांमध्ये 300 मोठे डेरे आहेत, ज्यांचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे.
रोहतक: बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमची फर्लोवर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. गुरमीत हरियाणातील रोहतक तुरुंगात बंद आहे. पंजाबमधील निवडणुकीच्या 13 दिवस आधी त्याची तुरुंगातून सुटका होत असल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. पंजाबमधील 23 जिल्ह्यांमध्ये 300 मोठे डेरे आहेत, ज्यांचा राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. यामुळेच राम रहिमची पॅरोल मंजूर झाल्याची चर्चा आहे.
डेरा सच्चा सौदा हरियाणातील सिरसा जिल्ह्यात आहे. पंजाबमधील मालवा भागातील सुमारे 69 जागांवर त्याचा मोठा प्रभाव आहे. गुरमीत राम रहीमच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर सुनारिया तुरुंगाबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. हरियाणा तुरुंग विभागाने सिरसा डेरा प्रमुख राम रहीमच्या 21 दिवसांच्या फर्लो (रजा) अर्जाला मंजुरी दिली आहे. रोहतक आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर त्याला तुरुंगाबाहेर आणले जाईल.
राम रहीमला घेण्यासाठी ताफा रवाना
सिरसा डेरालाही राम रहीमला पॅरोल मिळाल्याची माहिती मिळाली आहे. तेथे उपस्थित भाविकांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली असून, एक ताफा राम रहीमला घेण्यासाठी रोहतकच्या सुनारिया कारागृहाकडे रवाना करण्यात आला आहे. दोन साध्वींवर बलात्कार आणि दोन हत्या केल्याप्रकरणी राम रहीम सुनारी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
निवडणुकांमध्ये डेराचा प्रभाव
2007पासून गुरमीत राम रहीमने राज्याच्या राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली होती. 2007, 2012, 2017 पंजाब विधानसभा निवडणुकीत डेराचा मोठा प्रभाव दिसला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुका आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीतही डेरा प्रमुखाने पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशनचे कौतुक केले होते. मतांच्या राजकारणासाठी सर्व नेते डेराकडे जातात.