Gurmeet Ram Rahim Honeypreet: हनीप्रीत आता झाली 'रुहानी दीदी', पॅरोलवर बाहेर येताच गुरमीत राम रहीमची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 09:35 AM2022-10-26T09:35:54+5:302022-10-26T09:36:23+5:30
'डेरा सच्चा सौदा'च्या सिंहासनावर कोण बसणार, याबद्दलही दिलं उत्तर
Gurmeet Ram Rahim named Honeypreet as Ruhani Didi: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि बलात्कार खटल्यातील दोषी गुरमीत राम रहीम ४० दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. हरियाणातील पंचायत आणि आदमपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी राम रहीमला पॅरोल देण्यात आल्याने विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. याच दरम्यान, राम रहीमने त्याच्या विश्वासातील सहकारी असलेली हनीप्रीत हिचे नाव बदलून आता 'रुहानी दीदी' ठेवल्याचे समोर आले आहे. पॅरोलवर बाहेर आलेल्या राम रहीमकडून डेऱ्याच्या गादीवर कोण बसणार, याबद्दलही मोठे विधान करण्यात आले आहे.
गुरमीत राम रहिमला कोर्टाने तुरूंगवासाची शिक्षा ठोठवल्यानंतर डेरा सच्चा सौदाच्या सिंहासनावर कोण बसणार, नेतृत्वबदल होणार का, अशा प्रश्नांना उधाण आले होते. पण या दरम्यान राम रहीमने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. "(डेरा सच्चा सौदाच्या) सिंहासनावर मी आहे, मी होतो आणि मीच सिंहासनावर कायम राहणार," अशी घोषणा त्याने केली. हनीप्रीतचे नाव बदलून 'रुहानी दीदी' ठेवणे आणि गादीवर स्वत:ला कायम ठेवणे या दोन्ही घोषणा राम रहीमने उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमात सत्संग सुरू असताना उपस्थितांना संबोधित करताना केल्या.
दरम्यान, हरियाणातील आगामी नागरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते गुरमीत राम रहीम यांच्या सत्संगाला पोहोचून आशीर्वाद घेत आहेत. तुरुंगातून बाहेर पडताच राम रहीमने सोशल मीडियावर स्वत:चा एक व्हिडिओ अपलोड केला आणि आपल्या अनुयायांना एक संदेश दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने दोन वेळा सत्संग केला. हा सत्संग यूट्यूबवर उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इत्यादी प्रांतात आणि परदेशात राहणाऱ्या अनुयायांनी ऐकला. राम रहीमने उत्तर प्रदेशातून ऑनलाइन सत्संग केला. सत्संगात कर्नाल जिल्ह्यातील साधूसंतांनी एकत्र येऊन सत्संग ऐकला. यावेळी जिल्ह्यातील पंचायत निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनीही आशीर्वाद घेतले. त्यापैकी कर्नाल महानगरपालिकेच्या महापौर रेणू बाला गुप्ता, जिल्हाध्यक्ष योगेंद्र राणा, उपमहापौर नवीन कुमार आणि वरिष्ठ उपमहापौर राजेश यांनीही गुरमीत राम रहीमच्या भाषणादरम्यान उपस्थिती लावली आणि त्यांना कर्नालमध्ये येण्याचे निमंत्रण दिले.
हत्या आणि लैंगिक गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या राम रहीमसमोर भाजप नेत्यांचे झुकणे हा चर्चेचा विषय होत चालला आहे. सत्संगाला हजेरी लावलेल्या ज्येष्ठ उपमहापौरांनी सांगितले की, कर्नालचा सत्संग खूप मोठा होता. ज्यांना ज्यांना माहिती मिळाली ते लोक सत्संगासाठी हजर झाले. यूपीमधून ऑनलाइन सत्संग झाला. सत्संगाला आलेल्या लोकांशी माझी गाठभेट झाली. माझ्या प्रभागातील अनेक लोक बाबांचे अनुयायी आहेत, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोक आले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"