गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरण : सिरसातील कर्फ्यूदरम्यान शाळा-कॉलेज राहणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 08:56 AM2017-08-29T08:56:52+5:302017-08-29T09:00:52+5:30
दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.
सिरसा, दि. 29 - दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार करणा-या बाबा राम रहीमला, सीबीआय न्यायालयाने सोमवारी प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपये भरावे लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले. यापार्श्वभूमीवर सिरसा येथील परिस्थिती नियंत्रणात राहावी यादृष्टीने तेथे कर्फ्यू लावण्यात आला होता. दरम्यान येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पाहून प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या कर्फ्यूदरम्यान मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शाळा व कॉलेज सुरू राहणार आहेत, शिवाय येथील स्थानिक जीवनावश्यक वस्तूंची खरेदीही करू शकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सिरसा शहरात डेराचे मुख्यालय आहे. सोमवारी संपूर्ण दिवसात सिरसा येथे कर्फ्यू लावण्यात आला होता आणि शिक्षेची सुनावणी होण्यापूर्वीच पोलीस, निमलष्करी दल आणि लष्करा अशी कडेकोट सुरक्षाव्यवस्था सिरसा येथे तैनात करण्यात आली होती. जेणेकरुन परिसरात कोणत्याप्रकारे हिंसाचार उफाळून येऊ नये.
मात्र शिक्षा सुनावण्यात येण्यापूर्वीच डेरापासून सहा किलोमीटर अंतरावर गुरमीत राम रहीमच्या अनुयायांनी गाड्यांची जाळपोळ करण्यास सुरुवात केलीय
दरम्यान,दोन्ही गुन्ह्यांसाठी प्रत्येकी 10 वर्षे शिक्षा झाली असल्याने, बाबाला तब्बल 20 वर्षे तुरुंगात काढावी लागणार आहेत. शिक्षा सुनावल्यावर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले, तेव्हा त्याचे भरजरी कपडे काढून तुरुंगातील वेश घालण्यासाठी दिला गेला. तुरुंगात जाण्यासाठी बाबा तयार होईनात, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना ओढत कोर्टाबाहेर काढले, तेव्हा ते ‘कोई तो मुझे बचाओ’ असे रडून ओरडत होते. बाबाने आजारपणाचा कांगावा केला. मला काही झाले, तर त्याची जबाबदारी सरकारवर असेल, अशीही त्यांनी धमकी दिली.मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा यांनी तपासून बाबा ठणठणीत असल्याचा निर्वाळा दिल्यावर, त्यांची रवानगी तुरुंगात झाली. न्यायालयाने खासगी कपडे वापरण्यास मनाई केल्याने, बाबांचा झगमगीत पोशाख उतरवून, त्यांना कैद्याचा चौकडीचा वेश देण्यात आला.
सीबीआय न्यायालयाचे न्या. जगदीप सिंह यांना विशेष हेलिकॉप्टरने दुपारी रोहतक येथे आणण्यात आले. तेथून ते तेथील सुनरिया तुरुंगात गेले आणि त्यांनी बाबाला शिक्षा सुनावली. ती सुनावताच, बाबा राम रहीम धाय मोकलून रडू लागला आणि माफीची मागणी करू लागला. ‘माझ्यावर दया दाखवा, मी समाजसेवक आहे,’ असे तो हात जोडून सांगत होता. त्याच्या वकिलांनीही त्याची सजा कमी करावी, अशी मागणी केली, पण शिक्षेत बदल झाला नाही.
बाबा राम रहीमने 2002 साली आपल्या सिरसा आश्रमातील गुहेमध्ये दोन साध्वींवर बलात्कार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केल्यानंतर, त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिका-यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, पण अधिका-यांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल झाले. न्या. जगदीप सिंह यांनीही अत्यंत निडरपणे निकाल दिला.
आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू
सोनिपत जिल्ह्यात आश्रमात घातलेल्या झडतीत काठ्या व इतर वस्तू सापडल्या. पेट्रोल, डिझेल आणि हत्यारे आदी वस्तू लपवून ठेवल्याच्या संशयानंतर, पोलिसांनी ही मोहीम राबविली. सिरसाजवळील ग्रामस्थांनी डेरासमर्थकांशी दोन हात करण्यासाठी, दगड, विटा, काठ्या यांची जमवाजमव करून ठेवली होती. शाहपूर बेगुतील लोकांनी सांगितले की, सुरक्षेसाठी आम्ही सज्ज आहोत. राज्यात आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे.
राम रहीमवर आणखी २ खटले
बलात्काराची बातमी प्रसिद्ध करणा-या पत्रकाराचा खून केल्याप्रकरणाची सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार आहे.डेरा मुख्यालयात ४५६ शिष्यांना नपुंसक केल्याप्रकरणी ऑक्टोबरमध्ये निकाल आहे.