डेराचे प्रमुख बाबा राम रहीम कोर्टापुढे 'ढेर', बलात्कारप्रकरणी न्यायालयाने ठरवलं दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 03:05 PM2017-08-25T15:05:25+5:302017-08-25T15:26:56+5:30
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
चंदीगड, दि. 25 - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी आज हा निकाल दिला. या प्रकरणात त्यांना सात ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निकालानंतर बाबा राम रहीम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अंबाला येथील तुरूंगात त्यांची रवानगी होणार आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये बाबाचे लाखो समर्थक जमा झाले आहेत. निकालानंतर हिंसाचार उसळण्याची शक्यता असल्याने हरियाणा आणि पंजाबमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हरियाणाच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. याशिवाय कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पंजाब आणि हरियाणा राज्यांतील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने 50 पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे. राम रहीम यांच्यावर त्यांच्या आश्रमातील दोन साध्वींवर 15 वर्षांपूर्वी बलात्कार केल्याच्या आरोपाखाली खटला सुरू आहे.
राम रहीमबाबतच्या निकालाच्या पार्श्वभुमिवर हरियाणा सरकारने कलम 144 लावलं असून राज्यातील शाळा आणि कॉलेज आज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय 24 आणि 25 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर केली होती.पंचकुला जिल्ह्यात सध्या दोन हजारांहून जास्त जवान सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. जिल्ह्याला छावणीचं स्वरुप आलं आहे.
राम रहीमविषयी-
गुरुमीत राम रहीम यांच्यावर बलात्कारापासून खुनाचे व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्यांनी आपल्या ४00 पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. डेरा सच्चा सौदा पंथाच्या बेकायदा कामाविषयी वृत्तपत्रात लिखाण करणा-या पत्रकाराची हत्या त्यांच्याच सांगण्यावरून झाली होती, असे बोलले जाते. शीख समाजाचे गुरू गोविंद सिंह यांच्यासारखी वेशभूषा राम रहीम यांनी केल्याने त्या समाजाने संताप व्यक्त केला होता.
शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण : राम रहीम यांच्यावरील चित्रपटातील बराच भाग आक्षेपार्ह असल्याने त्यास संमती देण्यास सेन्सॉर बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्ष लीला सॅमसन यांनी २0१५ साली नकार दिला होता. त्या चित्रपटास संमती द्यावी, यासाठी केंद्र सरकार आपल्यावर दबाव आणत आहे, अशी तक्रारही श्रीमती सॅमसन यांनी केली होती. राम रहीम यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात असल्याच्या तक्रारीनंतर हरयाणा उच्च न्यायालयाने त्याची नियमित तपासणी करावी, असे आदेश दिले होते.
कोण आहे बाबा गुरमीत राम रहीम-
15 ऑगस्ट 1967 रोजी बाबा गुरमीत राम रहीम यांचा जन्म झाला. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील गुरुसर मोदिया येथे एका शीख कुटुंबात ते जन्माला आले. वयाच्या सातव्या 31 मार्च, 1974 रोजी तत्कालीन डेरा प्रमुख शाह सतनाम सिंह यांनी राम रहीम असं त्यांचं नाव ठेवलं. 23 सितंबर, 1990 रोजी शाह सतनाम सिंह यांनी देशभरातील अनुयायांचं सत्संग बोलावलं आणि गुरमीत राम रहीम सिंह यांना आपला उत्तराधिकारी घोषीत केलं. राम रहीम यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी दोन मुलींशिवाय हनीप्रीत हिला दत्तक घेतलं आहे.