गुरुदासपूर पोटनिवडणुकीत स्वर्णसिंग सालरिया भाजपाकडून लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 11:45 AM2017-09-22T11:45:17+5:302017-09-22T11:45:24+5:30
अभिनेते व खासदार विनोद खन्ना यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी कविता खन्ना यांना भाजपा तिकीट देईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपाने उद्योजक स्वर्णसिंग सालरिया यांना उमेदवार घोषित केले आहे.
नवी दिल्ली, दि.22 - अभिनेते व खासदार विनोद खन्ना यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी कविता खन्ना यांना भाजपा तिकीट देईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपाने उद्योजक स्वर्णसिंग सालरिया यांना उमेदवार घोषित केले आहे.
काँग्रेसतर्फे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड आणि आपतर्फे मेजर जनरल(नि)सुरेश खजुरिया निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुरुदासपूर हा भाजपाचा गड मानला जातो. अभिनेते विनोद खन्ना हे या मतदारसंघातून चारवेळा लोकसभेत निवडून गेले होते. २००९ चा अपवाद वगळता १९९८ पासून विनोद खन्ना येथून लोकसभेत निवडून गेले. २००९ साली काँग्रेसचे प्रतापसिंग बाजवा यांना जनतेने कौल दिला होता.
पंजाब भाजपाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री विजय सांपला यांनी कविता खन्ना आणि स्वर्णसिंग सालरिया ही दोन्ही नावे पक्षश्रेष्ठींना १६ सप्टेंबर रोजी झालेल्या जालंधरच्या बैठकीत कळविली होती. त्यानंतर हा निर्णय झाला. सालरिया गुरुदासपूरमधील चौहाना गावचे असून विविध उद्योगक्षेत्रांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे.
योगगुरु बाबा रामदेव यांचाही त्यांना पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते तसेच राजपूत असल्याने ते ही निवडणूक सहज व योग्य मताधिक्य राखून विजयी होतील असा भाजपाला विश्वास वाटत आहे. सालरिया हे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पठाणकोट येथे चिंतपूर्णी वैद्यकीय महाविद्यालय, सुरक्षासेवा उद्योग अशा उद्योगात ते कार्यरत असून हेलिकॉप्टर व चार्टर विमानांचाही व्यवसाय ते करतात.
२००९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारल्यावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन तिकडे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेथे अपयश आल्यावर ते पुन्हा भाजपात आले. २०१४ सालीही सालरिया यांना गुरुदासपूरमध्ये पक्ष आपल्याला संधी देईल असे वाटत होते. मात्र भाजपाने पुन्हा विनोद खन्ना यांना संधी दिली होती.