"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 03:07 PM2024-09-21T15:07:23+5:302024-09-21T15:12:50+5:30
कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तरुण बाईकवरून जात असताना कारला धडकला.
गुरुग्राममध्ये कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तरुण बाईकवरून जात असताना कारला धडकला. अक्षत गर्ग असं या तरुणाचं नाव आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षतचा या अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कुलदीप ठाकूर असं आरोपीचं नाव असून तो कार चालवत होता. या घटनेनंतर काही वेळातच पोलीस ठाण्यातून आरोपीला जामीन मिळाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आरोपीला जामीन मिळाल्याने अक्षतची आई प्रचंड संतापली आहे.
आपल्या मुलाला न्याय देण्याची मागणी आईने केली असून पोलीस मदत करत नसल्याचा आरोप केला आहे. आज तकशी बोलताना अक्षत गर्गची आई आणि भावाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. "सुरुवातीला आमची एफआयआर नोंदवण्यात आली नव्हती, आम्ही दबाव आणला, त्यानंतर त्यांनी एफआयआर नोंदवला."
"पोलीस आमचे कॉल उचलत नाहीत किंवा आम्हाला कोणतेही अपडेट देत नाहीत" असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सहा दिवस होऊन गेले असले तरी आमच्याकडे पीएम रिपोर्ट नाही, अक्षतची आई रडत म्हणाली की, "जर पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर ३० मिनिटांत आरोपीला जामीन दिला असता का?"
"राजकीय दबावामुळे आरोपीला सोडण्यात आलं का? तो कसा सुटला जाऊ शकतो? इतके दिवस तो ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय कसा कार चालवत होता? नेते जेव्हा मतांची गरज असते तेव्हा येतात. आता आठवडा होत आहे पण कोणीही मदतीला आलं नाही. तो कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा होता" असं अक्षतच्या आईने म्हटलं आहे.