Corona Vaccination: धक्कादायक! कोवॅक्सिनचा दुसरा डोस घ्यायला गेलेल्या तरुणाला 'चुकून' दिली कोविशील्ड अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:01 AM2021-08-26T08:01:26+5:302021-08-26T08:04:35+5:30
Corona Vaccination: कोरोना लसीकरण केंद्रावर निष्काळजीपणा; कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे एकच खळबळ
गुरुग्राम: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. केरळमध्ये ओणमनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. मात्र बऱ्याच
ठिकाणी लसींचा तुटवडा असल्यानं लसीकरणाला ब्रेक लागला आहे. तर काही ठिकाणी लस देताना होत असलेल्या चुकांमुळे डोकेदुखी वाढत आहे.
उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात २० जणांना चुकून वेगवेगळ्या कंपन्याच्या कोरोना लसीचे डोस देण्यात आले होते. त्यानंतर आता गुरुग्राममध्ये असाच प्रकार घडला आहे. सरकारी लसीकरण केंद्रावर दुसऱ्या डोससाठी गेलेल्या हरतीरथ यांना कोविशील्ड लस देण्यात आली. त्यांना पहिला डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला होता.
'मला कोवॅक्सिनऐवजी कोविशील्डचा डोस देण्यात आल्याचं लक्षात येताच डॉक्टर आणि नर्सेसकडून माझ्यावर लक्ष ठेवण्यात आलं. काही साईड इफेक्ट्स दिसतात का ते पाहण्यात आले. मात्र कोणतेही मोठे साईड इफेक्ट्स दिसून आले नाहीत,' अशी माहिती हरतीरथ यांनी दिली. विशेष म्हणजे हरतीरथ यांनी लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना आपण कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आल्याचं सांगितलं होतं. मात्र तरीही त्यांना कोविशील्ड देण्यात आली.
हरतीरथ यांनी झालेला प्रकार सोशल मीडियावर मांडला. काही माध्यमांनी हरतीरथ यांना लसीचा दुसरा डोस देणाऱ्या महिलेशी संवाद साधला. डॉ. हरदीप असं संबंधित कर्मचाऱ्याचं नाव आहे. याबद्दल मी कोणतंही विधान करू शकत नाही. याविषयी बोलण्याची परवानगी मला देण्यात आलेली नाही. मात्र या प्रकरणी सीएओ आणि डीसींनी लेखी उत्तर देण्यास सांगितलं आहे, अशी माहिती हरदीप यांनी दिली.