RSSनंतर आता भाजपाच्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 01:28 PM2018-09-02T13:28:01+5:302018-09-02T14:40:51+5:30
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमानंतर आता भाजपाच्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावल्यानं झालेला वाद ताजा असतानाच आता मुखर्जी यांनी भाजपाच्या कार्यक्रमात उपस्थित दर्शवली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी (2 सप्टेंबर) गुरुग्राम येथे भाजपाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळेस त्यांच्यासोबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर देखील उपस्थित होते.प्रणव मुखर्जी आणि मनोहर लाल खट्टर यांनी गुरुग्राममधील हरचंदपूर आणि नयागावम येथे ''स्मार्ट ग्राम परियोजना'' अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पाचे उद्धाटन केले.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या कार्यकाळादरम्यान हरचंदपूर गाव दत्तक घेतले होते. यानंतर गावामध्ये कित्येक सोयीसुविधा उपलब्ध झाल्याचे म्हटले जात आहे. हरचंदपूर गावास आदर्श गाव बनवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गत ग्रामसचिवालयात वाय-फायपासून ते डिजिटल स्क्रीनपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.
दरम्यान, यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की, हरियाणामध्ये 'प्रणव मुखर्जी फाऊंडेशन' आरएसएसोबत मिळून काम करणार आहे. मात्र, असे काहीही होणार नसल्याचं प्रणव मुखर्जी यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी जून महिन्यात प्रणव मुखर्जी यांनी नागपुरात आरएसएस मुख्यालयात एका कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. आरएसएसच्या कार्यक्रमात मुखर्जी मुख्य अतिथी म्हणून हजर राहिले होते. या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्तीवर आपले विचार मांडले होते.
प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात त्यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही नाराजी व्यक्त केली होती. काही नेत्यांनी तर मुखर्जींचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती.
Haryana: Former President Pranab Mukherjee and Haryana CM ML Khattar at inauguration of projects in Smartgram Yojana. Under this scheme, Pranab Mukherjee had adopted villages in 2016, in Gurugram's Alipur pic.twitter.com/zjvu2lc1X8
— ANI (@ANI) September 2, 2018