साध्वीकडील सामानात गुरूंची कवटी, अस्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:59 AM2021-09-09T05:59:32+5:302021-09-09T05:59:52+5:30
साध्वी योगमाता धार्मिक शहर उज्जैनमधील एका आश्रमातील असून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने जाण्यासाठी त्या येथील विमानतळावर आल्या होत्या.
इंदूर (मध्यप्रदेश) : इंदूरमधील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळावर सोमवारी साध्वी योगमाता यांच्याकडील बॅगेत मानवी कवटी आणि अस्थी निघाल्या. साध्वीकडील बॅगच्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. लगेच पोलिसांना कळविण्यात आले. साध्वी योगमाता यांच्या म्हणण्यानुसार त्या त्यांच्या गुरूंच्या अस्थी व कवटी हरिद्वारला विसर्जित करण्यासाठी घेऊन जात होत्या. पूर्व परवानगी नसल्यामुळे योगमाता यांना दिल्लीला जाऊ दिले गेले. परंतु, अस्थी आणि कवटी इंदूरमध्येच ठेवून घेण्यात आली.
साध्वी योगमाता धार्मिक शहर उज्जैनमधील एका आश्रमातील असून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने जाण्यासाठी त्या येथील विमानतळावर आल्या होत्या. नियमांनुसार विमानतळावर साध्वी योगमाता यांच्याकडील सामानाची तपासणी झाल्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांना संशयास्पद वस्तू दिसली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सामान उघडून पाहिले तेव्हा मानवी कवटी दिसली.
परवानगी लागते
प्रवाशांना अशाप्रकारचे सामान सोबत घेऊन जायचे असल्यास आधी परवानगी घ्यावी लागते. साध्वी यांनी अशी परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे साध्वी यांना कवटी व अस्थींसोबत प्रवासाची परवानगी दिली गेली नाही. त्यांचे म्हणणे नोंदवून घेऊन त्यांना सोडून दिले गेले, असे शर्मा म्हणाले.