आईची माया! ...म्हणून मुलाच्या मृतदेहासमोर गायलं लोकगीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 10:44 AM2019-11-04T10:44:44+5:302019-11-04T11:05:18+5:30
आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये अशीच एक निशब्द करणारी घटना घडली आहे.
राजनांदगाव - आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. आईची माया खूपच अनमोल असते. छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये अशीच एक निशब्द करणारी घटना घडली आहे. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने त्याच्या मृतदेहासमोर लोकगीत गायल्याची घटना समोर आली आहे. 'चोला माटी के राम, एखर का भरोसा...' हो लोकगीत गायलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजनांदगावमधील सूरज तिवारी याचं शनिवारी निधन झालं. सूरजची संगीतकार अशी ओळख होती. लोककला सादर करणाऱ्या सूरजला चोला माटी के राम हे गाणं खूप जास्त आवडत होतं. त्यामुळे आपल्या अंत्ययात्रेत आईने हे गाणं म्हणावं अशी त्याची इच्छा होती. तसेच अंत्ययात्रेत गीत आणि संगीत वाजवण्यात यावं असंही त्यांने म्हटलं होतं. मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सूरज तिवारी याची आई पूनम तिवारी यांनी त्याच्यासाठी मृतदेहासमोरच लोकगीत गायलं आहे.
सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून लोक हे पाहून निशब्द झाले आहेत. सूरज छत्तीसगडच्या राजनांदगावचा रहिवासी आहे. त्याच्या मृत्यूनंतर घरामध्ये अंत्ययात्रा सुरू करण्यापूर्वी त्याच्या आईने मृतदेहासमोर 'चोला माटी के राम, एखर का भरोसा' हे गायले. याआधी सूरजची आई पूनम तिवारी यांनी अनेक व्यासपीठावर चोला माटी के राम हे गाणं गायलं आहे. सूरजला हे गाणं खूप आवडायचं. मात्र जेव्हा मुलाच्याच मृतदेहासमोर हे गाणं गाण्याची वेळ आली तेव्हा मात्र उपस्थितांना आपल्या भावना रोखता आल्या नाहीत.
सूरजच्या मित्रांनी त्यांना साथ म्हणून तबला, हारमोनियम वाजवले. लोकगीत गाऊन पूनम तिवारी यांनी आपल्या मुलाला निरोप दिला. आपल्या मुलासाठी हीच योग्य श्रद्धांजली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत दिले आहे. आपल्या मुलाची शेवटची इच्छा होती ती पूर्ण केल्याची माहिती पूनम तिवारी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. सूरजला गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्याचे निधन झाले.