रोजंदारी मजूर 5-10 रुपयांची नाणी घेऊन स्कूटी खरेदीसाठी पोहोचला, हातात चावी मिळताच अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:17 PM2022-04-06T17:17:48+5:302022-04-06T17:20:13+5:30
Guwahati : उपेन रॉय 2014 पासून आपली ड्रीम बाईक विकत घेण्यासाठी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी पिगी बँकेत जमा करत होते.
गुवाहटी : जे लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात, त्यांना अखेर यश मिळते. आसाममधील या रोजंदारी मजुराची कहाणीही अशीच आहे. राजधानी गुवाहाटीतील बोरगाव परिसरात रोजंदारीवर काम करणाऱ्या उपेन रॉय यांचे दुचाकी खरेदी करण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी पिगी बँकेत जमा करण्यास सुरुवात केली. पैसा जमवताना बरीच वर्षे गेली, पण शेवटी उपेन रॉय यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले.
उपेन रॉय 2014 पासून आपली ड्रीम बाईक विकत घेण्यासाठी 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांची नाणी पिगी बँकेत जमा करत होते. मंगळवारी त्यांनी पिगी बँकेतून पैसे मोजले असता त्यांच्याकडे दीड लाख रुपये जमा झाले होते. त्यानंतर रॉय आपल्या पत्नीसह बाईक खरेदी करण्यासाठी पोहोचले. त्यांनी लगेच नाणी घेऊन जवळच्या शोरूम गाठले. यानंतर त्यांनी 90 हजार रुपयांना स्कूटी खरेदी करून त्यांचे जुने स्वप्न पूर्ण केले.
ड्रीम स्कूटी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर उपेन रॉय यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते आनंदाने रडू लागले. ते म्हणाले, "दुचाकी खरेदी करण्याचे माझे स्वप्न होते. यासाठी मी 2014 पासून नाणी जमा करण्यास सुरुवात केली. आज मी त्याची मोजणी केली तेव्हा मला कळले की दुचाकी घेण्यासाठी पैसे जमा झाले आहेत. त्यानंतर मी दुचाकी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलो. माझे दुचाकी खरेदी करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले याचा मला खूप आनंद आहे."
दुचाकी शोरूमचे डीलर मनीष पोद्दार यांनी याविषयी सांगितले की, "शोरूमच्या मालकाने जेव्हा एक ग्राहक नाण्यांचा साठा घेऊन दुचाकी खरेदी करण्यासाठी आल्याचे पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. यानंतर त्यांनी त्यांच्या बँकेशी संपर्क साधून एवढ्या मोठ्या प्रमाणात नाणी स्वीकारता येतील का, अशी विचारणा केली. बँकेने त्यास नकार दिला. मात्र, शोरूम मालकांनी यामुळे निराश न होता काही विक्रेते व दुकानदारांशी बोलून नाणी बदलून घेण्यासंदर्भात चर्चा केली. शोरूममधील चार कर्मचाऱ्यांना नाणी मोजण्यासाठी सुमारे दोन तास लागले. शेवटी उपेन रॉय यांना ड्रीम बाईक मिळाली आणि शोरूमने त्याचा गौरव केला."