गुवाहाटी दौऱ्याला ११ जणांची दांडी; आमदार बच्चू कडू मात्र सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 08:22 AM2022-11-27T08:22:02+5:302022-11-27T08:22:38+5:30
सत्तेत आल्यानंतर तब्बल ४० दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच राज्याचा कारभार पाहिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई ते गुवाहाटी या शिंदे गटाच्या गाजलेल्या दौऱ्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे मुंबईत परतले आणि मुख्यमंत्री झाले. आता एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदार आणि समर्थक खासदार पुन्हा कामाख्या देवीला जाणार हे निश्चित झाले होते. सर्वानुमते ठरल्यानुसार २६ नोव्हेंबरला कामाख्या देवीचे दर्शन झालेही, मात्र या दौऱ्यातून चार मंत्री, चार आमदार आणि तीन खासदार यांनी काढता पाय घेतल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटात पुन्हा नाराजी तर नाही ना, अशा चर्चा रंगल्या.
सत्तेत आल्यानंतर तब्बल ४० दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीच राज्याचा कारभार पाहिला. नंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात ९ आमदारांनाच संधी मिळाली होती. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी पसरली होती, आमदार संजय शिरसाट, बच्चू कडू यांनी तर उघडपणे नाराजी व्यक्त केली. आमदारांतील नाराजीची चर्चा सुरू असताना गुवाहाटी दौरा ठरला. २१ नोव्हेंबर तारीख ठरली, पण ऐनवेळी रद्द झाली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवीन तारीख जाहीर होईल, असे जाहीर केले. पण जेव्हा २६, २७ नोव्हेंबर ही तारीख ठरली तेव्हा प्रत्यक्षात गुलाबराव पाटीलच या दौऱ्यात सामील झाले नाहीत.
अनुपस्थित आमदार, खासदार
कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील हे अनुपस्थित राहिले. सत्तारांनी कृषी प्रदर्शन, तानाजी सावंतांनी आरोग्य शिबिर, गुलाबराव पाटील यांनी दूध संघ निवडणूक, शंभूराज देसाई यांनी लग्नकार्याचे कारण दिले. त्याचप्रमाणे आमदार महेश शिंदे, चंद्रकांत पाटील, अनिल बाबर, संजय गायकवाड, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे यांनीही अनुपस्थितीचे वैयक्तिक कारण दिले.
बच्चू कडू दौऱ्यात सामील : मंत्रिपदावरून ज्यांच्या नाराजीची सर्वाधिक चर्चा रंगली ते बच्चू कडू मात्र या दौऱ्यात सहभागी झाले. आमदार राणा यांच्या ५० खोक्यांच्या आरोपांमुळे कडू आणि राणा यांच्यात टोकाचा वाद सुरू झाला होता.