रुग्ण दगावल्याचं सांगत वॉर्ड बॉयनं व्हेंटिलेटर काढला; नातेवाईकांनी पाहिलं तर धक्काच बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 05:46 PM2022-03-02T17:46:09+5:302022-03-02T17:48:26+5:30
रुग्ण दगावल्याचं सांगत वॉर्ड बॉयनं ऑक्सिजन, व्हेंटिलेटर काढला; ड्रिपदेखील हटवला
ग्वाल्हेर: मध्य प्रदेशच्या चंबळमधील सगळ्यात मोठ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला आहे. जनारोग्य रुग्णालयात जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आलं. न्युरोसर्जरी विभागात हा धक्कादायक प्रकार घडला. ब्रेन हॅम्रेज झालेल्या शिवकुमार उपाध्याय यांचा मृत्यू झाल्याचं सांगत वॉर्ड बॉयनं त्यांचा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर काढला. सोबतच ड्रिपदेखील हटवला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत एकच गोंधळ घातला.
रुग्णाची प्रकृती सुधारत होती. त्यांच्या हृदयाचे ठोकेदखील सुरू होते, असं म्हणत कुटुंबीयांनी गोंधळ घातला. त्यानंतर वरिष्ठ न्युरोसर्जन यांनी उपाध्याय यांची नाडी तपासली. उपाध्याय यांचा श्वास सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर पुन्हा लाईफ सपोर्ट सिस्टिम सुरू करण्यात आली. जवळपास २० मिनिटं रुग्णाला लाईफ सपोर्ट सिस्टिम आणि ऑक्सिजनशिवाय ठेवण्यात आलं होतं असं कुटुंबीयांनी सांगितलं.
या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याचं रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर. के. एस. धाकड यांनी सांगितलं. या प्रकरणी दोन परिचारिकांना निलंबित करण्यात आलं आहे. वॉर्ड बॉयलादेखील कामावरून कमी करण्यात आलं आहे. सध्या त्याच वॉर्डमध्ये रुग्णावर उपचार सुरू आहेत.